८४० थकीत मालमत्ता धारकांना बजावल्या नोटीस
By Admin | Updated: March 30, 2015 00:01 IST2015-03-30T00:01:14+5:302015-03-30T00:01:14+5:30
अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी असताना महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरुच ठेवले आहेत.

८४० थकीत मालमत्ता धारकांना बजावल्या नोटीस
अमरावती : अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी असताना महापालिका प्रशासनाने उत्पन्न वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. मोठी थकबाकी असलेल्या ८४० मालमत्ता धारकांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहकार्य न केल्याने काहींना जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत.
सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात मालमत्तांचे उत्पन्न ४० कोटी गृहित धरण्यात आले होते. त्यानुसार ७५ टक्के वसुलीचा टप्पा गाठला गेला. १५ मार्चपर्यंत मालमत्ता करातून तिजोरीत २५ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात मालमत्ताकरातून ५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यानुसार मालमत्ताकराची रक्कम समाविष्ट करुन अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र, यापूर्वी करवसुली दरम्यान आलेला अनुभव लक्षात घेता प्रशासनाने वर्षांतून दोन वेळा देयके नागरिकांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांना कराचा भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. पाचही झोनमध्ये सहायक आयुक्तांवर मालमत्ता वसुलीची जबाबदारी आयुक्त अरुण डोंगरे यांनी सोपविली आहे.
मालमत्ता कराच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मुभा सहायक आयुक्तांना प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार कर वसुलीसाठी नोटीस बजावणे, मालमत्तांना टाळे लावणे, दंडात्मक रक्कम वसूल करणे आदी कारवाई सतत करण्यात आली आहे. मात्र अनेकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे ही रक्कम त्वरित वसूल व्हावी, यासाठी थकीत ८४० मालमत्ताधारकांना नोटीस बजावून जप्तीची ताकीद देण्यात आली आहे. आठवडाभरात कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल. महापालिका अधिनियमानुसार ही कारवाई केली जाईल. जप्ती टाळण्यासाठी मुदतीच्या आत कर भरणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.
कर वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे मोठी रक्कम थकित आहे, अशांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आठ दिवसात ही कारवाई होईल.
-महेश देशमुख, कर व मूल्य निर्धारण अधिकारी
सुटीच्या दिवशी करवसुली ३६ लाख
महापालिकेच्या पाचही झोनमध्ये मालमत्ता करवसुलीसाठी शनिवार, रविवार या दोन दिवस विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार तिजोरीत ३६ लाख रुपये जमा झाले आहे. यात पाचही सहाय्यक आयुक्तांसह मंगेश वाटाणे, येलगुंदे, श्रीवास्तव, निकम, गंगात्रे, ज्ञानेश्वर इंगोले, अलुडे, प्रवीण इंगोले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.