पुष्प प्रदर्शनीत ८०० फुलांच्या प्रजाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 00:15 IST2016-01-26T00:15:41+5:302016-01-26T00:15:41+5:30
प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे.

पुष्प प्रदर्शनीत ८०० फुलांच्या प्रजाती
जागतिक पातळीवर मान्यता मिळालेले गुलाबही : संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वृक्ष-पर्यावरणप्रेमींची गर्दी
अमरावती : प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भस्तरीय पुष्पप्रदर्शनीत ८०० प्रजातींची फुले व वृक्षे येथे पहावयास मिळणार आहे.
येथे विदर्भस्तरीय स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोधप्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने तसेच गार्डन क्लब प्रायोजित सदर प्रदर्शनी असून यामध्ये विविध वृक्षे ठेवण्यात आले आहेत. तसेच उच्च विद्याविभूषित नामांकित लेखकांची कादंबरी, लेख व गोष्टीची पुस्तकांची प्रदर्शनी लागली आहे. शेवंतीचे जागतिक पातळीवरील १६ वर्गीकृत प्रकार ठेवण्यात आले आहे. अमरावती गार्डन क्लबचे माजी अध्यक्ष पद्माकर चव्हाण यांनी विकसित केलेल्या गुलाबांच्या तीन वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीही प्रदर्शनीचे विशेष आकर्षण ठरले आहे.
वसंत, मुक्ता व पद्माकर या विकसित केलेल्या महत्त्वपूर्ण गुलाबाच्या प्रजाती फ्लावर प्रेमींना पाहता येणार आहे. या तीनही प्रजातींना जागतिक पातळीवर 'अमेरिकन रोज फेडरेशन' याची मान्यता मिळाली आहे. तसेच ३२ प्रकारच्या गटामध्ये आऊटडोअर प्लांट, इंडोअर प्लांट, बोन्सा फ्लावर, अरेंजमेंट, हँगिंग प्लांट, मिनीएचर प्लांट्स कॅप, कट फ्लावर गुलाब, फ्लोरोड्रय फ्लावर अरेंजमेंट, फ्लावर बुके, कोल्टर इनोव्हेटिव्ह आदी अनेक महत्त्वाच्या प्रजाती येथील पुष्पप्रदर्शनीत पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. याठिकाणी ६ प्रकारच्या ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणार असून प्रवीण खोडके मेमोरीयल ट्रस्टतर्फे गुलाबाची ट्रॉफी, एम.एम. शहा मेमोरीयलतर्फे शवंती ट्रॉफी तसेच चार महत्वाच्या ट्रॉफी गार्डन क्लब अमरावतीच्यावतीने अमेरिका येथील नागरिक एलेक्सकुमार, एवेनकुमार यांच्यावतीने देण्यात येणार आहे. महत्त्वाची मानली जाणारी अमरावती गार्डन क्लब चॅम्पियन आॅफ चॅम्पियन ट्रॉफी देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनीला माजी आमदार सुलभा खोडके, काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, जिल्हा पोलीस अधीक्षक लख्मी गौतम, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, ग्रंथाली प्रकाशन मुंबईचे सुदेश हिंगलासपूरकर आदींनी भेटी दिल्यात. त्यांचा प्रदर्शनीत फ्लावर संशोधक प्राचार्य सी.एम. देशमुख, व्ही.आर. देशमुख, रेखा मग्गीरवार, मानवेंद्र देशमुख, दिनेश खेडकर, सुभाष भावे हेडाऊ आदींचे महत्त्वाचे योगदान राहिले.
-तर महापालिका पहिल्या क्रमांकावर - गुडेवार
अमरावती : शहरात अद्यापही १७ हजार कुटूंब उघड्यावर शौचाला बसतात. महापालिका शौचालय बांधून देत आहेत. कर्मचारी घरोघरी जाऊन अर्ज भरुन घेत आहेत. आतापर्यंत ९ हजार कुटुंबांना शौचालय बांधून दिले आहेत. मार्चपर्यंत १०० टक्के शौचालयांचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले तर राज्यातील २६ महापालिकांमध्ये अमरावती महापालिका प्रथम क्रमांकावर राहिल, असे यावेळी बोलताना महापालिका आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.
‘तिने’ चुकविले हृदयाचे ठोके
संचालनकर्त्यांनी अभिनेत्री लांबा यांनी युवकांचे हृदयाचे ठोके वाढविले आहेत असे म्हणताच मिनिषाने स्मित हास्य केले. पांढरा स्कर्ट व त्यावर साजेशे स्वेटर परिधान केलेल्या मिनिषाने उपस्थित तरूणाईला मोहित केले.
महिलांच्या सक्षमीकरणाच गरज - सुलभा खोडके
बचतगटांच्या माध्यमातून चांगले उद्योग करुन त्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे माजी आमदार सुलभा खोडके यांनी सांगितले. नागरिकांमध्ये फुले व वृक्षांची आवड निर्माण होऊन त्यांचे घरोघरी संगोपन करावे, असेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्त-सीईओंची जुगलबंदी
नवनियुक्त सीपी मंडलिक यांच्याकडे इशारा करीत जि.प.सीईओ सुनील पाटील म्हणाले, आम्ही दोघेही मनाने तरुण आहोत. आम्ही सोबत काम केले आहे. मात्र, ते केस काळे करतात. मी मात्र डांबरीकरणाचे काम करणार नाही. या जुगलबंदीने उपस्थितांमध्ये हास्याचे फव्वारे उडाले.
बचत गटांचे सामाजिक योगदान महत्त्वाचे - राजुरकर
महिला सक्षमीकरणासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. आता ती एक चळवळ झाली असून बचत गटांचे आर्थिक, सामाजिक कार्यात मोठे योगदान असल्याचे मत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी व्यक्त केले.
पर्यावरण संतुलनासाठी जनजागृतीचे कार्य
यांत्रिक युगात वायू, ध्वनीप्रदूषण प्रचंड वाढत आहे. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने निसर्गचक्र बदलत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम जाणवत आहे. भविष्यात मानवी जीवनावर याचा परिणाम होणार असल्याने शासनामार्फत झाडे लावा झाडे जगवा, वृक्षलागवड आदी योजना राबविली जाते. यावर अमाप पैसा खर्च होत असूनही योजनेंतर्गत लावली जाणाऱ्या झाडांची नोंद केवळ कागदावरच राहते. मात्र वैयक्तिकरीत्या लावलेले वृक्ष निश्चित जगतात. हे अनुभव अमरावती गार्डन क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शहरात विविध संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजात पर्यावरणाशी निगडित वृक्ष व फुलझाडे लावण्याची मानसिकता प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, यादृष्टीने जनजागृती करण्याचा मोलाचा वाटा या संस्थेचा आहे.