८० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
By Admin | Updated: September 20, 2015 00:40 IST2015-09-20T00:40:53+5:302015-09-20T00:40:53+5:30
पुंडलिकबाबा नगरात झुडुपाआड साठा : महसूल विभागाची कारवाई

८० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त
अमरावती : शहरात अवैध वाळू साठ्यांवर कारवाईचा सपाटा सुरुच आहे. याच श्रृंखलेत शनिवारी स्थानिक टॉवर लाईन परिसरातील पुंडलिकबाबा नगरात ८० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाने पोलीस संरक्षणात केली. या वाळूची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याची माहिती आहे.
नदी, नाल्यातून नियमबाह्य उपसा करुन सदर वाळू ही शहरात साठवून ठेवली जाते. साठवलेली वाळू ही चढ्या दरात विकण्याचा सपाटा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र वाळू तस्करांची मुस्कटदाबी करण्यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांनी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने शहरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांवर धाडसत्र राबवून ते जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. जप्त वाळू साठ्यांचे लिलाव करुन ती रक्कम तिजोरीत जमा केली जात आहे. आतापर्यत ४७ अवैध वाळू साठे जप्त करण्यात आले असून ३० वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. लिलावातून आलेली रक्कम महसूल ुिवभागात जमा करुन उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत. येथील पुंडलिकबाबा नगरात जप्त करण्यात आलेली वाळू ही ८० ब्रास असल्याचे तहसीलदार बगळे यांचे म्हणने आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढे या वाळूचा नियमानुसार लिलाव केला जाणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनुसार ही कारवाई केली जात आहे. जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्याच्या परसिरात एम. एच. ३१, एम. ५८४९ क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या ट्रकद्वारेच वाळू वाहतूक होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज महसूल विभागाचा आहे. रसूल खान हयात खान नामक व्यक्तीचा हा अवैध वाळू साठा असल्याचे जप्ती पंचनामा करताना महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. ही वाळू सर्वे. क्र. ४९ मध्ये साठवून ठेवण्यात आली होती.
जप्त वाळू साठ्याचा लिलाव लवकरच केला जाईल, असे तहसीलदार बगळे यांनी सांगितले. या कारवाई दरम्यान पीएसआय बालाजी पुंड, पोलीस कर्मचारी राहुल ग्वालवंशी, मंडळ अधिकारी एस. के. कल्याणकर आदी तलाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)