७८ गोवंशाचा कंटेनर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 23:14 IST2019-02-14T23:14:22+5:302019-02-14T23:14:42+5:30
गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली.

७८ गोवंशाचा कंटेनर पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा/आसेगाव पूर्णा : गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर बुधवारी जप्त करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दर्यापूर फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चार आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाइलसह १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर, १९ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७८ बैल व गोऱ्हे असा ३४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. २५ गोवंशाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अयूब खाँ कुदरत खाँ (५३, रा. मोतीलालनगर, करोद पुलिया, भोपाळ, मध्यप्रदेश), अकबर खाँ बाबू खाँ (३३, रा. बरखेडा कला, ता. आलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश), वकील अली अजीज अली (३३, रा. सारंगपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) व माजिद खाँ शफीक खाँ (२६, रा. सारंगपूर, जि. राजगढ, मध्यप्रदेश) या चार आरोपींना अटक करण्यात आली.
परतवाडा ते आसेगाव रस्त्याने गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील किनगे यांनी नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान यूपी २१ सीएन २६४६ या क्रमांकाच्या कंटेनरला पोलिसांनी दर्यापूर फाट्याजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनचालकाने वेग वाढविला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून कंटेनरला पकडले. त्यातील चौघांना विचारणा करण्यात आली.
कंटेनरमध्ये ७८ बैल व गोऱ्हे आढळून आले. चारही आरोपींविरुद्ध आसेगाा पूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, तर गोवंश रासेगाव स्थित शिवशक्ती गौरक्षण सेवाभावी संस्थेस सुरक्षेच्या दृष्टीने सोपविण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक जयंत मिणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक किरण वानखडे, वासुदेव नागलकर आदीनी ही कारवाई केली. यादरम्यान कंटेनरला एमपी ०९-०१४३ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने पायलटिंग करणारे आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.