७७७ कोटींचे ‘बजेट’
By Admin | Updated: April 1, 2017 00:10 IST2017-04-01T00:10:11+5:302017-04-01T00:10:11+5:30
महापालिकेच्या ७७७.२६ कोटींच्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी सभागृहाने शिक्कामोर्तब केले. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

७७७ कोटींचे ‘बजेट’
सभागृहात वादळी चर्चा : मालमत्ता कर, काटकसरीचा मुद्दा गाजला
अमरावती : महापालिकेच्या ७७७.२६ कोटींच्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी सभागृहाने शिक्कामोर्तब केले. स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. उत्पन्न व खर्चामध्ये सुधारणा सुचवून अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
तत्पूर्वी महापालिकेची आर्थिक स्थिती, मालमत्ताकराची रखडलेली वसुली, उत्पन्नाचे मर्यादित स्त्रोत आणि महापौरांसह नगरसेवकांच्या निधीत प्रशासनाने केलेली कपात याविषयावर विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रारंभिक शिल्लक धरून ७७७.२६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून त्यातून ६६३.६३ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. वर्षाअखेर ११३.६३ कोटी रूपये शिल्लक राहतील, असा अंदाजही बजेटमध्ये व्यक्त करण्यात आला. सुरूवातीलाच मालमत्ताकराचा मुद्दा पेटला. मालमत्ताकराचा मूळ अंदाज ४० कोटी असताना यंदा ३८ कोटीच कसे, असा सवाल बसपचे गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला तर विलास इंगोले यांनी त्याला दुजोरा देत उत्पन्न वाढते की कमी होते, असा सवाल करीत उत्पन्नाच्या बाजूवर चर्चा झालीच पाहिजे, असे आग्रही मत मांडले. याशिवाय बॉबकट, जेसीबी आणि टँकरचे पैसे मागणे महापालिकेला शोभत नाही, हा निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह निलिमा काळे, प्रशांत डवरे आदी सदस्यांनी केला. महापौरांच्या खर्चात कपात करणारे तुम्ही कोण, असा सवाल इंगोलेंनी विचारला. करवसुली वाढविण्यासाठी करवसुली लिपिकाची प्रामाणिकता तपासण्याची गरज ज्येष्ठ सदस्य प्रकाश बनसोड यांनी व्यक्त केली. यावेळी पिठासीन सभापती म्हणून महापौर, उपमहापौर तथा आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित होते. ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बन्सोड यांनी बडनेरा येथे स्पर्धा परीक्षार्थींसाठी ५० लाखांची तरतूद करुन अभ्यासिका मंजूर करुन घेतली.
इंगोले, पवार, शेखावत आक्रमक
अनेक वर्षानंतर विरोधी बाकावर आलेले विलास इंगोले, बबलू शेखावत, चेतन पवार यांनी अत्यंत आक्रमक आणि अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले. चेतन पवारांनी प्रशासनाला घायकुतीस आणले. अर्थसंकल्पीय सभेत उत्पन्नाच्या बाजूवर बोललेच गेले पाहिजे, असे आग्रही मत शेखावत आणि इंगोलेंनी मांडले. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकच बजेटच्या आमसभेत चमकले.
म्हणून भूर्दंड नाही
मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे गरजेचे असल्याने प्रशासनाने ४० टक्के दरवाढ सूचविली होती. मात्र, बजेटमध्ये ही वाढ नाकारण्यात आली. त्याऐवजी कर आकारण्यात न आलेलया किंवा नव्या आणि विस्तारित बांधकामावर कर आकारणीचा मानस सभागृहात व्यक्त करण्यात आला.
२० लाख स्वेच्छानिधी
२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सदस्यांना प्रत्येकी २० लाख रुपये वॉर्डविकास व स्वेच्छानिधी दिला जाईल. स्थायीने केलेल्या या सूचनेवर सभागृहात सकारात्मक चर्चा झाली. स्थायीने तातडीच्या निधीमध्ये २.५० कोटींच्या अतिरिक्त तरतुदीची शिफारस केली.
असा येईल रुपया
मालमत्ताकर- ४५ कोटी
स्थानिक संस्था कर - ११० कोटी
जाहिरात कर - १.१० कोटी
व्यापारी संकुल - २ कोटी
परवाना फी - १.१० कोटी
परिवहन सेवा - १ कोटी
वृक्ष प्राधिकरण - १ कोटी
वृक्ष प्राधिकरण - ३० लाख
सांस्कृतिक भवन - ६३ कोटी
प्रा.शिक्षण अनुदान - १६ कोटी
जमिनीचे भाडे - ८० लाख
बाजारपेठ उत्पन्न - ८० लाख
असा जाईल रुपया
जीएडी- १६.१७ कोटी
नगरसचिव - २.३१ कोटी
करविभाग - ७.२५ कोटी
मानधन खर्च - १ कोटी
निवृत्तीवेतन - २० कोटी
सुरक्षा व्यवस्था - १.२५ कोटी
डिसीपीएस - २ कोटी
प्रकाश विभाग - ३५.६५ कोटी
अग्निशमन - ३.२७ कोटी
पाणीपुरवठा - २.४७ कोटी
स्वच्छता - १२ कोटी
पर्यावरण - २.७६ कोटी
साफसफाई - ११ कोटी
खतविभाग - १५ कोटी