वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 23, 2023 15:49 IST2023-07-23T15:49:26+5:302023-07-23T15:49:44+5:30
बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी
अमरावती : काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे लॉट खराब असल्याने पेरणीपश्चात उगवण न झाल्याच्या ७२ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या बोगस बियाण्यांमूळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सद्यस्थितीत समितीद्वारा या तक्रारीची पाहणी करण्यात येत आहे व त्यानंतर बियाणे सदोष असल्यास कंपनीला बियाणे बदल करावा लागेल किंवा परतावा द्यावा लागणार आहे. यंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुन घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरले. त्यामध्ये उगवण झालेली आहे. मात्र, काही कंपनीचे बियाणे पेरले असतांना उगवण झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी खरिपाचा हंगामच पावसाअभावी महिनाभर उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरणीला पहिलेच उशीर झालेला असतांना आता बियाण्यांची उगवण नसल्याने दुबार पेरणीचा व त्यासाठी पुन्हा खर्च करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.