७१ हजार मजुरांच्या हाताला गावातच काम; ६५८ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारची ४०,५८३ कामे सुरू
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 10, 2024 23:47 IST2024-05-10T23:46:56+5:302024-05-10T23:47:37+5:30
पाहा तालुकानिहाय मंजूर कामांची यादी

७१ हजार मजुरांच्या हाताला गावातच काम; ६५८ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारची ४०,५८३ कामे सुरू
गजानन मोहोड, अमरावती: ‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही अन् अर्धे आम्ही’ हा प्रकार केव्हाचाच बंद झाल्याने योजनेचे चित्र पालटले आहे. आता गावातील मजुरांच्या हाताला गावातच ‘मनरेगा’ची कामे उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७१,२०९ मजुरांना गावातच कामे मिळालेली आहेत. यामध्ये ६५८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची विविध ४०,५८३ कामे सुरु आहेत.
दुष्काळी भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या कामांवर मजुरांचा दुष्काळ असतो, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. यंदा मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे कामाच्या शोधात स्थलांतरित होणारे मजुरांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. किंबहुना याच उद्देशाने योजनेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली होती, त्याचे हे फलित मानण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक तथा वैयक्तिक लाभाची कामे जिल्हाभरात व प्रामुख्याने मेळघाटमध्ये करण्यात येत आहेत.
तालुकानिहाय मंजूर कामे
अचलपूर तालुक्यात ४५८३, अमरावती ६१७, अंजनगाव सुर्जी २९६, भातकुली १४३, चांदूर रेल्वे १५८, चिखलदरा ८५०, दर्यापूर १९२, धामणगाव रेल्वे २१७, धारणी ३२७, मोर्शी ६६२, नांदगाव खंडेश्वर २४८, तिवसा २९७ व वरुड तालुक्यात सद्यस्थितीत २३४ कामे मंजूर आहेत व यापैकी काही कामे सुरुदेखील झालेली आहेत.