७०८ गावे पाणी टंचाईच्या छायेत
By Admin | Updated: February 4, 2016 00:13 IST2016-02-04T00:13:00+5:302016-02-04T00:13:00+5:30
फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई ...

७०८ गावे पाणी टंचाईच्या छायेत
उपाययोजना : जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग सज्ज
अमरावती : फेब्रुवारीच्या सुरुवातीसच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील तब्बल ७०८ गावात पाणी टंचाईचे संकेत असून टंचाई निवारणार्थ प्रशासनाने सुमारे १० कोटी २३ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला अहे. संभाव्य पाणी टंचाई हाताळण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्याच्या काही भागात या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. परिणामी जिल्ह्यातील तब्बल ७० गावांना पाणी टंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाययोजनेस सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात नवीन विंधन विहीर घेण्याबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्या गावांमध्ये ७२६ उपाययोजना आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. यंदाचा कृती आराखडा १० कोटी २३ लाख रुपयांचा असून जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत ३१७ उपाययोजना त्या अंतर्गत करण्यात येणार आहेत. चिखलदऱ्यासह नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
ही आहेत टँकरग्रस्त गावे
दरवर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यामधील सहा गावात पाणीटंचाई भासते. त्यामुळे ढोमणी फाटा, हत्तीघाट, खडिमल, मोथाखेडा, तारूबांदा व आवागड या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. सध्या केवळ खडीमल गावातच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने आवश्यक तयारी केली आहे. सध्या केवळ एकाच ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास पाणी पुरवठा विभागाने खबरदारीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
-संजय येवले, उपकार्यकारी अभियंता
पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद.