७०५० अमरावतीकरांचे स्वप्न साकार
By Admin | Updated: March 17, 2016 00:14 IST2016-03-17T00:14:29+5:302016-03-17T00:14:29+5:30
महापालिका क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बुधवारी ७ हजार ५० घरे मंजूर झाली आहेत.

७०५० अमरावतीकरांचे स्वप्न साकार
पंतप्रधान आवास योजना : ८६० महापालिका कर्मचाऱ्यांंना घरे, १७५ कोटी मंजूर, पालकमंत्र्यांचे यश
अमरावती : महापालिका क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बुधवारी ७ हजार ५० घरे मंजूर झाली आहेत. त्यासाठी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सुमारे १७५.४५ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे आणि महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या पाठपुराव्याने शहरातील ७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न यामुळे साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१७५.४५ कोटी रूपयांमध्ये केंद्र व राज्य सरकारचा निधी समाविष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती महापालिका, अचलपूर नगरपालिका आणि अमृत योजनेमध्ये समाविष्ट अन्य शहरांमध्ये आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. अमरावती महापालिकेच्यावतीने सात हजारांपेक्षा अधिक घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने बुधवारी आयोजित बैठकीत त्या घरकुलांसाठी निधी मंजूर करण्यात आला. या निधीमधून आर्थिक व दुर्बल घटकांसाठी ६,१५८ घरे तर अमरावती महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी ८६० घरे बांधली जातील. मंत्रालयात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या कक्षात पर्यावरण विभागाच्या सचिव अय्यंगार, महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग यांच्यासह समाविष्ट महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निधी मंजूर करण्यात आला. आतापर्यंत अमरावती महापालिकेला १५,७९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. येथे मंजूर एकूण घरकुलांपैकी ६,१५८ घरकुल घटक क्रमांक चारमधून तर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी घटक क्रमांक ३ मधून मंजूर झाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
अमरावती महापालिका अव्वल
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ७ हजार ५० घरे मंजूर झाली आहेत. इतक्या मोठया प्रमाणात घरे मंजूर करणारी अमरावती महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका आहे. निधी उपलब्ध झाल्याने गोरगरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यामध्ये ३० चौरस मिटरचे घर मिळणार आहे. यातील ६१५८ लाभार्थ्यांना स्वत:च बांधकाम करावयाचे आहे. उर्वरीत घरे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आहेत.
प्रवीण पोटेंचा प्रभावी पाठपुरावा
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेचा वेळोवेळी आढावा घेतला. शनिवार १२ मार्चला पालकमंत्र्यांनी अमरावती महापालिकेला भेट देऊन या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांना दिशानिर्देशही दिले होेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून पालकमंत्र्यांनी महापालिकेत सर्व नगरसेवकांची बैठक घेतली आणि आयुक्त गुडेवार यांना त्वरित डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अवघ्या एका दिवसात डीपीआर तयार करण्यात आला. बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती शहराला ही भेट देण्यात आली.