भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापनदिन

By Admin | Updated: August 16, 2016 23:57 IST2016-08-16T23:57:51+5:302016-08-16T23:57:51+5:30

भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते पार पडले.

69th anniversary of Indian Independence | भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापनदिन

भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापनदिन

ध्वजारोहण : पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते मुख्य कार्यक्रम 
अमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलीस अधीक्षक लखमी गौतम उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासपर कामांवर प्रकाश टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरले असून जिल्ह्यातील २५३ गावांमध्ये ३३७०३ टीएमसी जलसाठा निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. २५३ पैकी १२७ गावांना १०० टक्के जलयुक्त घोषित करण्यात आले. राज्य शासनाने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून अनेक योजना यशस्वीरीत्या राबवीत आहेत. त्यामध्ये पांदण रस्ते विकास योजनेतून ९८५किलोमीटर पांदण रस्ते निर्माण झालेते. लोकसहभागातून या कामासाठी ७ कोटी, रोजगार हमी योजनेतून ३२ कोटी खर्च करण्यात आले. या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेता हा अमरावती पॅटर्न राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना लोकप्रिय ठरली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात ३१५९ शेतकऱ्यांनी मागणी केली असून ३६३ शेततळे पहिल्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात आली आहेत.
टेक्सटाईल पार्कमधील वस्त्रोद्योग कंपन्यामुळे जिल्ह्यात उद्योग विकासाची नांदी होत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र व उत्कृष्ट संसदपटू रा.सु.गवई यांचे भव्य स्मारक लवकरच साकारणार आहे.या स्मारकाचे भूमीपूजन विद्यापीठ परिसरात नुकतेच झाले. शहरातील रस्ते व पुलाकरिता सीआरएफ फंडातून निधी उपलब्ध झाल्याचेही ते म्हणाले.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ २ लक्ष १६ हजार शेतकऱ्यांना दिला गेला. प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज वाटप, कृषी समृद्धी महामार्ग, माझी कन्या भाग्यश्री आदी योजनांचा संक्षिप्त आढावा त्यांनी मांडला.यानंतर कृषी समृद्धी यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त शहर विभागातील शारदाचरण हरिनारायण तिवारी यांना गुणवत्ता सेवेबद्दल राष्ट्रपती भारत सरकारद्वारे आयपीएम पदक, प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. यामध्ये पी.के.देवरणकर, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवंत ऋषिल हेडा, खुशबु हेडा, आयएसओअंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामपंचायत चेनुष्टा व वऱ्हा येथील सरपंच व सचिव पूजा आमले, गणेश कांबळी यांचा सत्कार झाला. त्यामध्ये निकिता गौरकर, रोशनी पेठेकर, प्रियंका सराफ, अंकिता येवतकर, सोनाली धनसांडे. मौजा काटसूर, ता.तिवसा व मौजा लासूर, ता. दयार्पूर येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरुप काढण्याचा बचाव कार्याबद्दल तहसीलदार राम लंके व चमू व तहसीलदार राहुल तायडे व चमू यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. २८ जून रोजी तारखेडा येथील गुटखा साठा जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्याबाबत तहसीलदार सुरेश बगळे यांचा सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेन्द्र गवई, मनपा आयुक्त हेमंत पवार व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 69th anniversary of Indian Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.