डफरीनच्या अतिरिक्त रुग्णालयासाठी ६.८६ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:13 IST2021-04-10T04:13:30+5:302021-04-10T04:13:30+5:30
अमरावती : येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या २०० खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटी ८६ ...

डफरीनच्या अतिरिक्त रुग्णालयासाठी ६.८६ कोटी प्राप्त
अमरावती : येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या २०० खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ६ कोटी ८६ लाख इतका निधी वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांच्या उभारणीबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्याअंतर्गत जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांत विविध सुविधांची निर्मिती होत आहे. येथील डफरीन रुग्णालयाच्या अतिरिक्त रुग्णालयासाठी निधी मिळावा, यासाठी पालकमंत्र्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानुसार ६ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा महिला रुग्णालयात अतिरिक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आला होती. या मागणीनुसार, या इमारतीच्या बांधकामासाठी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा निधी वितरित करण्यात आला आहे.
या निधीतून डफरीन रुग्णालयात २०० खाटांचे अतिरिक्त रुग्णालय आकारास येणार आहे. कोरोनाकाळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी अनेकविध सुविधांच्या निर्मितीचे नियोजन केले. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांचे श्रेणीवर्धन, नव्या इमारतींची उभारणी अशा अनेक कामांना चालना मिळाली आहे. आरोग्य यंत्रणा भक्कम होऊन नागरिकांना चांगले उपचार मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
अमरावतीतील कुष्ठरोग धामाच्या परिरक्षणासाठी १ लाख २५ हजार रुपयांचे सहायक अनुदानही वितरित करण्यात आले आहे.