शहरातील ६८ रुग्णालयांकडे फायर एनओसी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:39+5:302021-01-19T04:15:39+5:30

(असाईनमेंट) अमरावती : भंडारा येथील दुर्देवी घटनेनंतर रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २१० रुग्णालयांची ...

68 hospitals in the city do not have fire NOC | शहरातील ६८ रुग्णालयांकडे फायर एनओसी नाही

शहरातील ६८ रुग्णालयांकडे फायर एनओसी नाही

(असाईनमेंट)

अमरावती : भंडारा येथील दुर्देवी घटनेनंतर रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २१० रुग्णालयांची नोंद आहे. यापैकी १४२ रुग्णालयांनी फायर ऑडिट करून एनओसी प्राप्त केली असली तरी ६८ रुग्णांलयांना जाग आलेली नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांवर महापालिकेचा अग्निशमन विभाग कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे.

दरम्यान महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी हा विषय गंभीरतेने घेण्याबाबत अग्निशमन विभागाला पत्र दिले आहे. याविषयी शासनानेदेखील अहवाल मागितला. मात्र, याविषयीची कोणतीही कारवाई होत नसल्याने रुग्णालयांकडून प्रतिसाद ढिम्म आहे.

वास्तविकत: मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ आणि २००६ अन्वये महापालिका क्षेत्रातील रुग्णालये, प्रसुतिगृहे, नर्सिंग होम आदींना दर तीन वर्षांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ लागू करण्यात आलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यातील लहान-मोठ्या घटनांसह, आता भंडारा व त्यापूर्वी सूरत व कोलकाता येथील घटनांनी याविषयीचे गांभीर्य वाढविले आहे.

वास्तविकत: महापालिका क्षेत्रात रुग्णालय बांधताना अग्निशमन विभागाची एनओसी अनिवार्य असते. यासाठी नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत एनओसी घ्यावी लागते. यासाठी आवश्यक ती उपकरणे व उपाययोजना सुचविल्या जातात व त्यानंतरच नगर रचना विभागाकडून प्रमाणपत्र मिळते.

रुग्णालय सुरू केल्यानंतरही वर्षातून दोन वेळा अग्निशमन विभागाची परवानगी घ्यावी लागते. यासाठी मान्यताप्राप्त एजन्सीकडून फायर ऑडिट केल्यानंतरच महापालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारा एनओसी देण्यात येत असल्याचे या विभागाचे अधीक्षक अजय पंधरे यांनी सांगितले.

पॉईंटर

नोंदणी असलेली रुग्णालये : २१०

नोंदणी नसलेली रुग्णालये : ००

फायर ब्रिगेडच्याद्वारा रुग्णालयाची तपासणी सुरू आहे.

बॉक्स

सरकारी रुग्णालयात नियम वाऱ्यावर

महापालिकेमध्ये सरकारी रुग्णालयाची नोंदणी नसते. त्यामुळे या रुग्णालयाची फायर ऑडिटची सक्ती नसते. मात्र, या रुग्णालयाकडून या सोईकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयात फायर ऑडिडचा फज्जा उडालेला आहे. याशिवाय तेथील अग्निशमनविषयक उपकरणांची मुदतदेखील संपलेली असल्याचे निदर्शनात आलेले आहे.

कोट

महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत २१० पैकी १६२ रुग्णालयाद्वारा अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. ज्या रुग्णालयांनी असे प्रमाणपत्र घेतले नाही किंवा नूतनीकरण केले नाही, अशा रुग्णालयांना नोटीस बजावण्यात येत आहे.

सुरेश पाटील, उपायुक्त, महापालिका

बॉक्स

वर्षभरापुर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात गंभीर प्रसंग

महापालिका क्षेत्रातील जिल्हा स्त्री रुग्णालयात २२ एप्रिल २०१९ रोजी एसएनसीयू विभागामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्रकार घडला होता. यावेळी या विभागात २२ बालके होती. त्यापैकी एक बालक या दुर्घटनेत दगावले. याप्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतरही या रुग्णालयाला जाग आलेली नाही. ‘लोकमत’द्वारा रिॲलिटी चेक केले असता अग्निरोधक यंत्र कालबाह्य असल्याचे दिसून आले होते. या रुग्णालयाने यापूर्वीच्या घटनेपासून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून आले.

Web Title: 68 hospitals in the city do not have fire NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.