आॅनलाईन रेशीमबंधनात अडकली ६७७ जोडपी
By Admin | Updated: May 23, 2017 00:08 IST2017-05-23T00:08:49+5:302017-05-23T00:08:49+5:30
धार्मिक रुढी, परंपरा यात गुरफटून न राहता आधुनिक पद्धतीने विवाह करण्याकडे अनेकांचा कल आहे.

आॅनलाईन रेशीमबंधनात अडकली ६७७ जोडपी
३७७ जोडप्यांना नोटिशी : आॅनलाईन विवाह नोंदणीला तरुणाईची पसंती
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धार्मिक रुढी, परंपरा यात गुरफटून न राहता आधुनिक पद्धतीने विवाह करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यानुसार १ मे २०१६ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत आॅनलाईन नोंदणी रेशीमबंधनात ६७७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. राज्य शासनाच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या आॅनलाईन विवाह नोंदणीस अनेकांनी प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. आॅनलाईन नोंदणी करताना नियोजित वधू-वरांना वयाचा दाखला, रहिवासी पुरावे एवढी अट पूर्ण करावी लागते. आॅनलाईन नोंदणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांच्या आत विवाह प्रक्रिया आटोपणे अनिवार्य आहे. जोडप्यांना एकूण ९० दिवसांचा कालावधी मिळत असल्याने ते सोयीचे ठरत आहे. आॅनलाईन विवाह नोंदणी ही प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. या विवाहाला कायदेशीर मान्यता असल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणी, भानगडीवर मात करण्यासाठी तरुणाईचा कल आॅनलाईन नोंदणी रेशीमगाठीकडे वाढत आहे. मागील वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकली की दरमहिन्याला ६० जोडपे आॅनलाईन नोंदणीच्या रेशीमबंधनात अडकले आहेत.
वर्षभरातील आॅनलाईन विवाहाची आकडेवारी
१ मे २०१६ पासून आॅनलाईन विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १ मे २०१६ ते ३० एप्रिल २०१७ ला कालावधीत ६७७ जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. यात मे २०१६ मध्ये ७२, जून- ६५, जुलै- ६२, आॅगस्ट- ५०, सप्टेंबर- ४२, आॅक्टोबर-३५, नोव्हेंबर- ५४ डिसेंबर- ५३ तर जानेवारी २०१७ मध्ये ६०, फेब्रुवारी- ६०, मार्च- ६२ व एप्रिलमध्ये ८२, अशी जोडपी विवाहबद्ध झाल्याची आकडेवारी आहे.
आॅनलाईन विवाह नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही पद्धत अतिशय सुलभ असल्याने अनेकांचा याकडे कल वाढत आहे. या विवाह नोंदणीला कायदेशिर आधार आहे.
- अ. म. धुळे, सहायक दुय्यम निबंधक (वर्ग २), अमरावती.