अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:58 PM2019-07-15T18:58:02+5:302019-07-15T18:58:17+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

67 lakh penalty for Mind Logic in Amravati University | अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड

अमरावती विद्यापीठात ‘माइंड लॉजिक’ला ६७ लाखांचा दंड

Next

 अमरावती - संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ ऑनलाइन कामांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या बंगळुरू येथील माइंड लॉजिक्स कंपनीला ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. देयके अदा करण्यापूर्वी दंडाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

   विद्यापीठात माइंड लॉजिक्स कंपनीचे सन २०१६ पासून आगमन झाले. मात्र, विधी, फार्मसी आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन परीक्षा आणि निकालात प्रचंड गोंधळ उडाला होता. सलग तीन वर्षांचा कालावधी होऊनही ऑनलाईन निकालात फारशा सुधारणा झाल्या नव्हत्या. अखेर सिनेट सभेने माइंड लॉजिक्ससोबत झालेला करार आणि निकालातील गोंधळाबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या अध्यक्षतेत समितीने माइंड लॉजिक्सने परीक्षा आणि निकालात घातलेल्या गोंधळबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे सादर केला. आॅनलाइन निकाल आणि केंद्रावर प्रश्नपत्रिका पाठविण्याचे दर यात बरेच गौडबंगाल असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मराठे समितीने सादर केलेल्या चौकशी अहवाल व्यवस्थापन समितीसमोर मांडला गेला. व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीसुद्धा ‘माइंड लॉजिक्स’वर अधिकाधिक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. 
दरम्यान, माइंड लॉजिक्सने पाऊणे दोन कोटींची देयके मिळण्यासाठी वित्त विभागाकडे सादर केलेली फाइल रोखण्यात आली. कार्यवाही पूर्णहोईस्तोवर देयके अदा करू नये, असा निर्णय व्यवस्थापन सभेत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनाने कारवाई केली. पहिल्या टप्प्यात माइंड लॉजिक्सकडून ४६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. एकूण बिलाच्या १५ टक्के दंड वसुलीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.


विश्रामगृहाचे भाडे वसूल
विद्यापीठातील विश्रामगृहाचे कक्ष माइंड लॉजिक्सच्या कर्मचा-यांनी  वापरल्या प्रकरणी ३ लाखांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. तशी शिफारस परीक्षा विभागाने वित्त विभागाकडे पाठविली तसेच महाविद्यालयात ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठविण्यात हयगय झाल्याप्रकरणी आठ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम वित्त विभाग वसूल करणार आहे. 

 
प्राचार्य ए.बी. मराठे समिती आणि व्यवस्थापन परिषद, सिनेट सभेने घेतलेल्या निर्णयानुसार माइंड लॉजिक्सकडून दंड वसूूल केला जात आहे. एकूण १५ टक्के बिलात कपात म्हणून आता ६७ लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
    - हेमंत देशमुख,
    संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

Web Title: 67 lakh penalty for Mind Logic in Amravati University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.