जुलैमधील बाधित पिकांसाठी ६५ कोटी उपलब्ध; दिवाळीपूर्वी मिळणार शासन मदत
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 4, 2023 17:15 IST2023-10-04T17:15:00+5:302023-10-04T17:15:57+5:30
अतिवृष्टीमुळे ९० हजार शेतकऱ्यांचे नुकसान

जुलैमधील बाधित पिकांसाठी ६५ कोटी उपलब्ध; दिवाळीपूर्वी मिळणार शासन मदत
अमरावती : यंदा जुलै महिन्यात संंततधार पाऊस व ४२ मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे ६१ हजार हेक्टरमधील पिके बाधित झाली होती. या आपत्तीचा ९१ हजार शेतकऱ्यांना फटका बसला होता. शासनाने या बाधित पिकांसाठी ६५.३१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दिवाळीपूर्वी ही शासन मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
यंदाच्या खरीप हंगामात मान्सूनला तीन आठवडे विलंब झाला व ५ जुलैपासून सक्रिय झालेल्या पावसाने ४२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली व खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले महसूल व कृषी यंत्रणेला दिले होते.
त्यानुसार ९५,५४१ शेतकऱ्यांचे ७२,०७२ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ७४.४० कोटींच्या मदतनिधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. प्रत्यक्षात शासनाने आता ९०२४४ शेतकऱ्यांसाठी ६५.३१ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत हा निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.