६१ लाखांच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडली !
By Admin | Updated: May 28, 2017 00:08 IST2017-05-28T00:08:47+5:302017-05-28T00:08:47+5:30
महापालिकेत हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी फाईलवरील धूळ नव्याने झटकण्यात आली आहे.

६१ लाखांच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडली !
हायड्रोलिक आॅटो खरेदीतील अनियमितता : ठाणेदारांनी मागितली माहिती
प्रदीप भाकरे । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेत हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी फाईलवरील धूळ नव्याने झटकण्यात आली आहे. या केससंदर्भात शहर कोतवाली पोलिसांनी महापालिकेला अनुषंगिक माहिती मागविली आहे. ६० लाख ९४ हजार ९७७ रुपयांच्या या अनियमिततेप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
महापालिकेचे तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी शामसुंदर सोनी यांनी सन २०१५ मध्ये या अनियमिततेची तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी मनियार अॅण्ड कंपनी अहमदाबादचे उपाध्यक्ष आ.ए.मनियार व अन्य तिघांविरुध्द भादंविचे कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी बनावट व खोटे दस्तावेजाच्या आधारे तेराव्या वित्त आयोगातील अनुदानातून ६० लाख ९४ हजार ९७७ रुपयांचा आर्थिक अपव्यवहार करून २३ हायड्रोलिक हॉपर आॅटो खरेदी केले होते. गुन्हा दाखल होण्यापूर्वी लेखापरीक्षण झाले आहे का, अशी विचारणा शहर कोतवाली पोलिसांनी महापालिका यंत्रणेला केली आहे. याशिवाय स्थानिक निधी संचालनालयाचे सन २०१२ व २०१३ चे लेखापरीक्षणाबाबत माहिती मागितली आहे. हा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यावेळी कार्यरत एका अधिकाऱ्यांवर निलंबनाची तलवार कोसळली होती. यावेळी हायड्रोलिक आॅटोचे दर २ लाख ५० हजार असताना अमरावती महापालिकेने मात्र २३ आॅटो प्रत्येकी ४.८९ लाख रुपयांप्रमाणे खरेदी केले होते. यात लाखोंचा अपहार झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक प्रदीप बाजड यांनी केला होता.त्यानंतर गुडेवार यांनी या प्रकरणी फौजदारीचे पाऊल उचलले होते.
महापलिकेकडून असहकार्य
याअगोदरही सन २०१२ व सन २०१३ च्या आॅडिटची माहिती मागितली होती.मात्र ती आतापर्यंत महापालिकेकडून प्राप्त झाली नसल्याचा ठपका शहर कोतवालीच्या निरिक्षक निलिमा आरज यांनी पाठविलेल्या पत्रातून ठेवला आहे.पुन्हा तीच माहिती मे २०१७ मध्ये मागविण्यात आली आहे.