गव्हाणकुंडला ६०० कोटींचा संत्रा प्रकल्प
By Admin | Updated: January 31, 2016 00:18 IST2016-01-31T00:18:31+5:302016-01-31T00:18:31+5:30
तालुक्यातील गव्हाणकुंड येथे ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

गव्हाणकुंडला ६०० कोटींचा संत्रा प्रकल्प
प्रधान सचिवांचा आढाव : शासनासह खासगी कंपन्यांचा संयुक्त उपक्रम
वरूड : तालुक्यातील गव्हाणकुंड येथे ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. राज्यशासन, कोकाकोला आणि जैन इरिगेशनचा संयुक्त प्रकल्प उभारणीला वेग आला आहे. शनिवारला सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, आ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी व संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी तपासून तसा अहवाल तयार केला. १०० एकर जागेत शेकदरी प्रकल्पालगत हा संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
वरुड तालुक्यात १७ हजार हेक्टर जमिनीवर संत्रा उत्पादित झाडे आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी योग्यवेळी भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादकांना नुकसान सहन करावे लागते. प्रतवारीनुसार संत्रा विकावा लागत असल्याने दर्जाहीन संत्र्याला भाव मिळत नाही. परिणामी ते फेकावे लागतात. अनेक वर्षांपासून संत्रा प्रकल्पाची मागणी रेटली जात आहे. परंतु यश आले नव्हते. अखेर वरुडला राष्ट्रीय संत्रा परिषद झाली असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.बोंडेंसह संत्रा उत्पादकांना संत्रा प्रक्रिया प्रकल्प देण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार ना.फडणवीस यांनी शासन, कोकाकोला आणि जैन इरिगेशन या कंपनीसोबत संयुक्तपणे हा प्रकल्प तालुक्यातील गव्हाणकुंड परिसरात शेकदरी प्रकल्पालगत सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार जागेची पाहणी व तांत्रिक बाबी तपासण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी किरण गिते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, जि.प. सदस्या अर्चना मुरुमकर, बाळासाहेब मुरुमकर कोकाकोला कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष सिंग, जैन इरिगेशनचे सतीश मुथा, किशोर रवाळे, बालकृष्णन, भाजपाचे तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, शशिकांत उमेकर, युवराज आंडे, मनोज माहूलकरसह आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)