सहकारी संस्थांचे ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण
By Admin | Updated: September 18, 2015 00:12 IST2015-09-18T00:12:20+5:302015-09-18T00:12:20+5:30
सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत बऱ्याच संस्था या कागदोपत्रीच असल्याचे आढळून आले आहे.

सहकारी संस्थांचे ६० टक्के सर्वेक्षण पूर्ण
प्रक्रिया : लवकरच होणार उर्वरित कारवाई
अमरावती : सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून आतापर्यंत बऱ्याच संस्था या कागदोपत्रीच असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या संस्थांचा समावेश आहे. महिनाअखेरपर्यंत हे सर्वेक्षण चालणार असून त्यामुळे या संस्थांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.
सहकारी संस्थांपैकी किती संस्था खऱ्या, किती कागदोपत्री याची माहिती घेण्यासाठी सहकार विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून यातून संपूर्ण राज्यात किती संस्था बनावट व कागदोपत्री आहेत, याची माहिती मिळणार आहे. अशा संस्था तातडीने बंद करून सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांना शिस्त लावली जाणार आहे. राज्यात १ लाख सहकारी संस्था बोगस असल्याचे आकडे पुढे येत आहेत. विविध विभागात सहकारी संस्थांचे मोठे जाळे असल्याने या ठिकाणी किती संस्था बोगस आहेत, याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. यामध्ये आतापर्यंत काही प्रमाणात संस्था कागदोपत्रीच असल्याचे दिसून आले आहे. त्यात सहकारी दूध डेअरी व इतर काही संस्थांचा समावेश आहे. यासोबतच गृहनिर्माण संस्थांचीही परिस्थिती थोडीफार अशीच आहे. काही संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, काहींचे आॅडीटही झालले नाही.नागरिक या सोसायटीत राहात असल्याने या संस्था जिवंत असल्याचे मानले जात आहे. या संस्था बंद करता येत नाहीत कारण तेथे राहणारे लोक व जागेचा प्रश्न पुन्हा उपस्थित होणार आहे.