५९ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:13 IST2021-03-21T04:13:26+5:302021-03-21T04:13:26+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास टप्पानिहाय सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ...

५९ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही लसीकरण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास टप्पानिहाय सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांत पात्र लाभार्थींचे लसीकरण करण्यात येत आहे. सध्याच्या टप्प्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती व ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र घेऊन येणारे अतिजोखमीच्या आजाराने ग्रस्त असणारे व्यक्ती यांना लसीकरण करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही याबाबत नुकताच आढावा घेऊन शक्य त्या सर्व ठिकाणी लसीकरण सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटरची उपलब्धता पाहून सध्या पीएचसी स्तरावर आठवड्यातील तीन दिवस किंवा ठराविक दिवस लसीकरण होईल. मात्र, आवश्यक मनुष्यबळ मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत व लवकरच लसीकरणाचे काम आणखी वेग घेईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी व्यक्त केला.
बॉक्स
मान्यवरांनी घ्यावा पुढाकार, ‘सीईओं’चे आवाहन
गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मान्यवरांशी समन्वय साधून नोंदणी व लसीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे. केंद्रावर रोज किमान शंभर ते दीडशे गावातील सर्व पात्र लाभार्थी लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील एक ते दीड महिन्यात लसीकरण पूर्ण केले जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्रास्तरावरील लसीकरण संपल्यानंतर उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे, असे सीईओंनी सांगितले.