जिल्ह्यातील ५५२ सरपंच,उपसरपंचाना मिळणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:26+5:302021-07-08T04:10:26+5:30

यशदा घेणार वर्ग धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील एक वर्षापूर्वी निवडून आलेल्या ५५२ सरपंच, उपसरपंचांना आगामी ...

552 sarpanches and deputy sarpanches in the district will get training | जिल्ह्यातील ५५२ सरपंच,उपसरपंचाना मिळणार प्रशिक्षण

जिल्ह्यातील ५५२ सरपंच,उपसरपंचाना मिळणार प्रशिक्षण

यशदा घेणार वर्ग

धामणगाव रेल्वे : जिल्ह्यातील एक वर्षापूर्वी निवडून आलेल्या ५५२ सरपंच, उपसरपंचांना आगामी महिन्यात यशदाद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या पदाधिकाऱ्यांची यादी पंचायत समितीस्तरावर तयार करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षण देण्यात यावे, या बाबीवर ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली, तर १८ जानेवारीला निकाल घोषित झाला होता. ११ ते २० फेब्रुवारीपर्यंत सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक झाली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संबंधित सरपंच, उपसरपंचाना प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. पंचायतराजमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ च्या कलम ५ अन्वये गावाचा कारभार चालतो. ग्रामपंचायतीचा वार्षिक आराखडा तयार करण्याचा अधिकार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत पुण्याच्या यशदाला पत्र पाठवले होते. राष्ट्रीय ग्राम स्वराज अधिकार अंतर्गत नव्याने निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंचांना अधिक प्रभावी भूमिका पार पाडता यावी, यासाठी प्रशिक्षन देण्यात येणार आहे

२९ बाबींवर मिळणार प्रशिक्षण

गावात रस्ते बांधणी, रस्त्यांची दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शिक्षण, आरोग्यविषयक सोयी, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना, गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था या २९ बाबीवर सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षण मिळणार आहे.

-----------------

धामणगाव रेल्वे तालुक्यातील सरपंच, उपरपंच यांची यादी तयार करून जिल्हा परिषदेला पाठविली आहे. मान्यता मिळताच पुढील महिन्यात या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

- माया वानखडे, गटविकास अधिकारी

-------------

कोरोनामुळे आम्हाला प्रशिक्षण मिळाले नाही. उशिरा का होईना, ग्राम स्वराजच्या विकासाचे धडे मिळणार आहेत.

- ममता राठी, सरपंच,गव्हा फरकाडे

Web Title: 552 sarpanches and deputy sarpanches in the district will get training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.