अमरावतीत अकरा महिन्यांत आढळले डेंग्यूचे ५४४ रुग्ण, एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीनपट वाढ

By उज्वल भालेकर | Published: December 9, 2023 07:43 PM2023-12-09T19:43:12+5:302023-12-09T19:43:42+5:30

...त्यामुळे यंदा ही आकडेवारी तीनपटीने वाढली असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

544 cases of dengue found in Amravati in eleven months, one death; Three times increase in the number of patients compared to last year | अमरावतीत अकरा महिन्यांत आढळले डेंग्यूचे ५४४ रुग्ण, एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीनपट वाढ

अमरावतीत अकरा महिन्यांत आढळले डेंग्यूचे ५४४ रुग्ण, एकाचा मृत्यू; गतवर्षीच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तीनपट वाढ

अमरावती : जिल्ह्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरणातील थंडावा हा कीटकजन्य आजार वाढीस कारणीभूत ठरत असून, जिल्ह्यात अकरा महिन्यांत ५४४ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर २१ ऑक्टोबरला एका डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यूदेखील झाला आहे. वर्ष २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत १८५ डेंग्यू रुग्ण होते. त्यामुळे यंदा ही आकडेवारी तीनपटीने वाढली असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

कीटकजन्य आजारांचे प्रमाण हे पावसाळ्यात वाढायला सुरूवात होते. ज्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार डोके वर काढतात. जागोजागी साचणाऱ्या पाण्यामध्ये डेंग्यू आजार पसरविणारे डास वाढतात. सध्या वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेला थंडावा हे कीटकजन्य आजार वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने रुग्णालयात जाऊन रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे. जिल्ह्यात जून २०२३ पासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली असून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूचही नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. 

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण
महापालिका क्षेत्रात सर्वाधिक डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात १०२७ डेंग्यू संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने आरोग्य विभागाने तपासले असता, यामध्ये ३३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यूदेखील डेंग्यूमुळे झाल्याची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे तर ग्रामीण भागातील १२८८ संशयित रुग्णांमध्ये २११ रुग्णांचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे.

११६ चिकुनगुनिया तर ३३ मलेरिया रुग्णांचीही नोंद
जिल्ह्यात डेंग्यूबरोबरच अकरा महिन्यांमध्ये ११६ चिकुनगुनिया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागात ७९ तर मनपा क्षेत्रात ३७ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचे एकूण ३३ रुग्ण असून, ग्रामीण क्षेत्रात २८ तर मनपा क्षेत्रात ५ रुग्ण आढळले आहेत.
 

Web Title: 544 cases of dengue found in Amravati in eleven months, one death; Three times increase in the number of patients compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.