५२ गावांनी रात्र काढली अंधारात
By Admin | Updated: July 13, 2015 00:27 IST2015-07-13T00:27:13+5:302015-07-13T00:27:13+5:30
भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे.

५२ गावांनी रात्र काढली अंधारात
तार चोरट्यांचा हैदोस : १५ दिवसांत चार घटना
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील सद्या वीज वितरण कंपनीचे तार चोरणारी टोळी सक्रीय झाली असून या १५ दिवसात चार चोरीच्या घटना घडल्या आहे. काल या तार चोरट्यांचा फटका चार फिडरवरील ५२ गावांना सहन करावा लागला. बायपासवरील रजनी मंगल कार्यालयामागे अज्ञात चोरट्यांनी जिवंत विद्युत तार कापून नेल्याने या गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
वीज वितरण कंपनीचे तांबा तार चोरणारी टोळी भातकुली व अमरावती तालुक्यात सक्रिय झाली आहे. या तार चोरट्यांनी या १५ दिवसात आतापर्यंत तीन धाडसी चोरी केल्या असून लाखोचा तांबा तार फस्त केला. काही दिवसापूर्वी या टोळीतील काही आरोपींना वलगाव पोलिसांनी अटक केली होती परंतु त्यांची न्यायालयाने जमानतीवर सुटका केल्याचे समजते. परंतु यानंतरही या टोळीतील चोरट्यांनी तार चोरीला आळा न घालता आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या.
वीज कर्मचाऱ्यांची धावपळ
टाकरखेडा संभू : शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अचानक आष्टी, कामुंजा, वलगाव व खारतळेगाव या चारही फिडरवरचा वीजपुरवठा अचानक बंद पडला आणि वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. फॉल्ट शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू झाला असता बायपास मार्गावरील रजनी मंगल कार्यालयामागे असलेल्या ३३ के. व्ही. विजेचा पुरवठा असलेल्या मुख्य तार जोडल्याचे त्यांच्या निदर्शनास पडले. पथक घटनास्थळी पाहताच चोरट्यांनी तेथून पोबारा केला. त्यामुळे या फिडरवरील ५२ गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. तार चोरट्यांची ही समस्या आता नागरिकांनाच नाही तर वीज वितरण कर्मचाऱ्यांना डोकेदुखी वाढली आहे. यावर आता पोलीस कसे पायबंद लावते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांसमोर मोठे आव्हान या तार चोरट्यांनी उभे केले आहे.