ग्रँड महेफिलचे पाच हजार चौरस स्क्वेअर फूट बांधकाम अवैध
By Admin | Updated: June 30, 2015 00:14 IST2015-06-30T00:14:33+5:302015-06-30T00:14:33+5:30
स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल ग्रँड महेफिलचे मंजुरीपेक्षा पाच हजार चौरस स्क्वेअर फूट अतिरिक्त बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ग्रँड महेफिलचे पाच हजार चौरस स्क्वेअर फूट बांधकाम अवैध
आयुक्तांनी दिले होते मोजणीचे आदेश : दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे संकेत
अमरावती : स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल ग्रँड महेफिलचे मंजुरीपेक्षा पाच हजार चौरस स्क्वेअर फूट अतिरिक्त बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हॉटेलच्या बांधकामाची मोजणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनीच दिले होते, हे विशेष!
गत आठवड्यात सहायक संचालक नगररचना अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात एका चमूने हॉटेल ग्रँड महेफिलच्या बांधकामाची तपासणी केली आहे. या हॉटेलच्या बांधकामाला सन २०१२-२०१३ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. प्रशस्त आणि भव्यदिव्य असे साकारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड महेफिलचे मूळ मालक कोण? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या राजकारणात हॉटेल महेफिलचा विषय प्रकर्षाने चर्चिला जातो, हे वास्तव आहे. मग ते अतिक्रमण असो वा पार्किंग, बांधकाम परवानगी अथवा कर आकारणीचा विषय असोत नगरसेवक हे या हॉटेल महेफीलकडे बोट दाखविल्याशिवाय राहत नाही. याच श्रृंखलेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नियमबाह्य बांधकाम, अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या २८ प्रतिष्ठानांची यादी तयार करुन त्यांचे मोजमाप करण्याचे ठरविले होते. यात हॉटेल महेफिल व हॉटेल ग्रँड महेफिलचा समावेश होता. परंतु या दोन्ही हॉटेलवर एका राजकीय व्यक्तीची कृपादृष्टी असल्याने महापालिका प्रशासन त्या बांधकामाचे मोजमाप करु शकत नाही, असा अंदाज बांधला गेला होता. परंतु सगळे अंदाज फोल ठरवीत आयुक्त गुडेवार यांनी हॉटेल ग्रँड महेफीलच्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक संचालक नगररचना विभागाचे सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्त्वात अभियंत्यांनी या दोन्ही हॉटेलच्या बांधकामाची तपासणी केली आहे. दोन्ही हॉटेलच्या बांधकामात किंतु-परंतु असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एडीटीपीला हजर राहण्याची सूचना
हॉटेल ग्रँड महेफिलच्या बांंधकाम तपासणीदरम्यान सहायक संचालक नगररचना (एडीटीपी) अधिकाऱ्यांना घटनास्थळी जातीने हजर राहण्याची सूचना आयुक्तांनी दिली होती. त्यानुसार गत आठवड्यात एडीटीपीने बांधकाम तपासणी केली आहे. बांधकाम तपासणीचा अहवाल तयार झाला असून आयुक्त येताच त्यांच्या पुढ्यात हा अहवाल ठेवण्यात येईल.
डहाके म्हणतात, आयुक्तांनी हेही करावे!
महापालिकेच्या मालकीचे जोशी मार्केट तसेच जोशी महल, ट्रक टर्मिनल, नवसारीतील बीओटी तत्त्वावरील संकुल यांची तपासणी करून आयुक्तांनी नियमसंगत कर वसुली करावी. हडपण्यात आलेली श्याम चौकातील पार्किंगची जागा आयुक्तांनी ताब्यात घ्यावी. महापालिकेच्या सभोवती असलेले मार्केट नियमानुसार चालेल, अशी शिस्तही गुडेवारांनी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता तथा ज्येष्ठ सदस्य दिगंबर डहाके यांनी केली.
हॉटेल महेफिल व ग्रॅड महेफिलच्या बांधकाम तपासणीचे आदेश दिले आहेत. त्याकरिता वरिष्ठ स्तरावरील वर्ग १च्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रकरणी अहवाल प्राप्त व्हायचा आहे. नियमसंगतरित्या प्रकरणाची दखल घेतली जाईल.
- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.