जिल्हा सीमेलगत ५०० पोती तांदूळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:21 IST2019-03-23T23:20:51+5:302019-03-23T23:21:03+5:30
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ५०० तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक तिवसा पोलिसांनी शुक्रवारी पकडला.

जिल्हा सीमेलगत ५०० पोती तांदूळ पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ५०० तांदळाची पोती घेऊन जाणारा ट्रक तिवसा पोलिसांनी शुक्रवारी पकडला.
अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेनजीकच्या भारवाडी गावाच्या पुढे असलेल्या पुलालगत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तूर्तास हे प्रकरण चौकशीत ठेवले असून, सदर तांदूळ काळाबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भंडारा महसूल विभागाच्या हद्दीतून यूपी ७१ टी ८५१८ क्रमांकाचा ट्रक तांदुळाचे ५०० पोते घेऊन धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जात होता. प्राथमिक माहितीनुसार, यातील तो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असून, तो अवैध पध्दतीने काळया बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय आहे.
तिवसा पोलिसांनी नाकेबंदीदरम्यान हा ट्रक ताब्यात घेतला. पोलिसांनी याबाबत भंडारा महसूल विभागाला पत्र लिहिले आहे. सदर तांदूळ नेमक्या कोणत्या ठिकाणी व विक्रीसाठी जात होता काय किंवा कसे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. ट्रकचालक व वाहकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अचलपूर तालुक्यात रेशनच्या तांदुळाच्या हेराफेरीची प्रकरणे घडली आहेत. त्याची लागण येथेही झाली काय, अशी विचारणा होत आहे.