अमरावती जिल्ह्यात वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 12:59 IST2018-10-26T01:34:42+5:302018-10-26T12:59:39+5:30
गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यात वाघावर लक्ष ठेवण्यासाठी ५० ट्रॅप कॅमेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. वाघांचे कॅरीडोर असलेल्या भागात हे कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक सुनील लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मंगरूळ दस्तगीर येथील राजेंद्र निमकर आणि अंजनसिंगी परिसरातील मोरेश्र्वर वाळके यांना वाघाने क्रूरतेने ठार केले. त्यानंतर वनविभागाने त्वरेने उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. एपीसीसीएफ सुनील लिमये यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सकाळच्या सुमारास वनाधिकाºयांची बैठक झाली. यात अमरावतीचे मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक हरिश्र्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे, वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर, चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिका आशिष कोकाटे आदी उपस्थित होते. पांढरकवडा, राळेगाव येथील नरभक्षी वाघिणीचा धुमाकूळ रोखण्यात वनविभागाला अपयश आले असताना अशातच धामणगाव रेल्वे तालुक्यात तीन दिवसांत दोन जणांचा बळी घेतल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे. अशातच गुरूवारी सकाळी या नरभक्षक वाघाचे मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा आदी भागात वास्तव्य दिसून आल्याने आता या परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. कुऱ्हा भागात जंगलात वन्यजीवांवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठिकाणी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाल्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजनांवर वनाधिकाऱ्यांनी मंथन केले. काही वनकर्मचाऱ्यांची चमू मोझरी, वऱ्हा, कुऱ्हा भागात तैनात करण्यात आली आहे. मात्र, वाघाच्या मानवसंहार रोखण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी काम करावे, अशा सूचना सुनील लिमये यांनी दिल्यात. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना भयभीत होण्यापासून रोखावे, असेही लिमये यांनी बैठकीत सांगितले.