राष्ट्रवादीत ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी
By Admin | Updated: October 8, 2016 00:13 IST2016-10-08T00:13:21+5:302016-10-08T00:13:21+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे.

राष्ट्रवादीत ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी
शरद पवार : स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग फुंकले
अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे. त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, ही बाब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केली.
स्थानिक देशमुख लॉनमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘रणशिंग’ विभागीय मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्याची प्रगती साधण्याची भूमिका मांडली. नवी फळी तयार करून राष्ट्रवादीला इतिहास रचायचा आहे. कर्तृत्ववान नेतृत्व तयार करण्याचे आवाहन करताना पवारांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले.
यश तुमचेच आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, अरूण गुजराथी, राजेंद्र शिंगणे, सुभाष ठाकरे, शरद तसरे, हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. संदीप बाजोरीया, राजकुमार पटेल, आ. ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, वसंत घुईखेडकर, बाबा राठोड, शेखर भोयर, गणेश खारकर, मेघा हरणे, स्मिता घोगरे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक सुनील वऱ्हाडे, संचालन क्षीप्रा मानकर, तर आभार बाबा राठोड यांनी मानले. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)
तिवस्यात शाई
फेकण्याचा प्रयत्न फसला
तिवसा : शरद पवार मोटारीने अमरावतीकडे जात असताना शुक्रवारी तिवस्यात त्यांचे स्वागत करताना शाई फेकण्याचा व काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी राज माहोरे यांना तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतले. शाई फेकण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्तरीत्या मिळाली होती. मोहोरे यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.