५० लाखांच्या मासोळी चोरीची चौकशी सुरू
By Admin | Updated: August 14, 2015 01:03 IST2015-08-14T01:03:13+5:302015-08-14T01:03:13+5:30
येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रुपयांच्या मासोळी चोरीच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

५० लाखांच्या मासोळी चोरीची चौकशी सुरू
मनिष कहाते वाढोणा रामनाथ
येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रुपयांच्या मासोळी चोरीच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यामुळे आता नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती तीन दिवसांत वरिष्ठांकडे सखोल चौकशी अहवाल सादर करणार आहे.
मागील चार वर्षांपासून येथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील मासोळी चोरीला जात आहे. मात्र लघुसिंचन विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने मासोळी चोरट्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे ग्रा.पं. सदस्य निकिता गायधनी यांनी सांगितले. महिनाभरापासून ‘लोकमत’ने मासोळी चोरीप्रकरणी सातत्याने वृत्त केले होते. त्याची दखल पंचायत समितीने घेतली आहे. १२ आॅगस्ट १५ रोजी विस्तार अधिकारी आणि त्यांची चमू यांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या मासोळी चोरीच्या संपूर्ण रेकॉर्डची तपासणी केली. तसा वस्तुनिष्ठ अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तो गोपनीय अहवाल जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना येणाऱ्या तीन दिवसांत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई सीईओ करतील.
चार वर्षांत ५० लाख रुपयांच्या मासोळ्या ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे चोरी गेल्यात. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने थातूर मातूर १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करुन १७ हजार रुपयांचा भरणा लघु सिंचन विभागाकडे केला होता. परंतु त्याची नोंद ग्रामपंचायतीच्या कोणत्याही रेकॉर्डमध्ये नसल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्य निकिता गायधनी यांनी सांगितले.
विशेष म्हणजे मासोळी प्रकरणाशी ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नाही, असा ठरावदेखील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला आहे. मग १७ हजार आणि करारनामा कोठून आला, असा प्रश्न ग्रा.पं. सदस्य निकिता गायधनी यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के.एन. घोंगडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.