५० बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: May 22, 2015 00:38 IST2015-05-22T00:38:20+5:302015-05-22T00:38:20+5:30
कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता जिल्ह्यात जवळपास ५० बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने एकत्रित केली आहे.

५० बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा
अमरावती : कुठलीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता जिल्ह्यात जवळपास ५० बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने एकत्रित केली आहे.
या डॉक्टरांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तालुकास्तरावर व ग्रामीण भागात अशा डॉक्टरांनी दुकाने थाटली आहेत. कोणालाही संशय येऊ नये म्हणून अशा बोगस डॉक्टरांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पदव्याही बोर्डावर लावल्या आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी आरोग्य यंत्रणा व गृहविभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने या डॉक्टरांचे फावले आहे. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी वैद्यक पुनर्विलोकन समितीच्या सभेत दिले.
परप्रांतीय बोगस डॉक्टर अधिक
फ्लाश गुलाल मंडळ शिंदखेड, पिजूस चिंतरंजन रॉय आसेगाव आणि संटू जगिंदरनाथ विश्वास मोर्शी या नियमबाह्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करण्याचा भोंदू डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे तिघेही डॉक्टर परप्रांतीय आहेत.
जिल्ह्यात ४० ते ५० बोगस डॉक्टरांची यादी तयार करण्यात असून त्यावर तालुकानिहाय कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. वैद्यक पुनर्विलोकन समितीची पुढील सभा २६ मे रोजी होणार आहे. त्यानंतर आणखी काही बोगस डॉक्टरांवर कारवाईचे संकेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.