दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावर ५० अपघात
By Admin | Updated: October 21, 2015 00:21 IST2015-10-21T00:21:52+5:302015-10-21T00:21:52+5:30
दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावरील डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. या मार्गाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावर ५० अपघात
रस्त्यांवर खड्डेच खड्डे : प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधीही सुस्त
लेहेगाव : दर्यापूर-अंजनगाव राज्य महामार्गावरील डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. या मार्गाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. ५० हून अधिक अपघात घडले आहेत. दर्यापूर-अंजनगाव हा ३० कि. मी. अंतराचा राज्य मार्ग क्रमांक २१२ असल्याने जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.
या परिसरातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी दर्यापूर-अंजनगाव मार्गावरून जावे लागते. त्यामुळे जड वाहनांसह या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्ता देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या आधीच या मार्गाची डागडुजी करण्यात आली. परंतु तीन महिन्यांतच हा मार्ग ‘जैसे थे’ झाला. दर्यापूरहून निघाल्यानंतर टाटानगर भागात आदिवासी आश्रमशाळेसमोर हा मार्ग अतिशय खराब झाला आहे.
विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असल्याने त्या ठिकाणी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. येथून ये-जा करताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मार्गाच्या दुर्दशेमुळे ५० हून अधिक घटना घडल्या आहेत. हा मार्ग दर्यापूर तर अंजनगावपर्यंत एकूण ११ गावांना जोडलेला आहे, हे विशेष. (वार्ताहर)
दर्यापूर-अंजनगाव राज्य मार्ग दुरूस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. लवकरच हा मार्ग दुरूस्त करण्यात येईल. या मार्गावरून मी स्वत: ये-जा करीत असतो. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील नागरिकांची मला काळजी आहे.
- रमेश बुंदिले, आमदार,
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ.
सतत आपल्या पाठीला झटके बसल्याने पाठीचा आजार होतोच. परंतु सतत असेच होत राहिल्यास पाठीचा मणका तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंबर आणि पाठीचा त्रास अशा खड्डेयुक्त रस्त्यांमुळेच वाढतो.
- डॉ.रवींद्र साबळे,
नवजीवन हॉस्पिटल, दर्यापूर.