‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना!
By Admin | Updated: May 27, 2016 00:08 IST2016-05-27T00:08:12+5:302016-05-27T00:08:12+5:30
मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या विशेष अनुदानापैकी ५ कोटी रुपये आ. सुनील देशमुख आणि आ. रवि राणा यांच्याकडे वळवण्यात येणार आहेत.

‘मूलभूत’चे ५ कोटी राणा-देशमुखांना!
आमदार विरुद्ध नगरसेवक वाद पेटणार : विभागीय आयुक्तांकडून शिक्कामोर्तब
प्रदीप भाकरे अमरावती
मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अमरावती महापालिकेला मंजूर झालेल्या विशेष अनुदानापैकी ५ कोटी रुपये आ. सुनील देशमुख आणि आ. रवि राणा यांच्याकडे वळवण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा महापालिकेत नगरसेवक विरुद्ध आमदार, असा संघर्ष पेटणार आहे.
अमरावती महापालिकेला ‘मूलभूत’ सुविधेअंतर्गत राज्य शासनाकडून ५ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. यात ५ कोटी रूपयांचा समभाग महापालिकेला द्यावयाचा आहे. उल्लेखनीय म्हणजे ५ कोटी रुपयांचा समभागाला हिरवी झेंडी देत महापालिकेने १०.४९ कोटी रुपयांची कामे सुचविली आहेत. या कामांची यादी जिल्हास्तरावरील समितीकडे सोपविण्यात आली आहे. महानगरपालिकांच्या मूलभूत सोई-सुविधांसाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या विशेष अनुदानातील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आली आहे. त्या समितीने उभय आमदारांना ५ कोटी रुपयांचा निधी देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला संमतीपत्र मागवले आहे. नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा निधी व तेवढ्याच अर्थात ५ कोटी रुपयांच्या महापालिकेचा समभागाचे रक्कमेतून १.७५ कोटी आ. रवि राणा आणि ३.२५ कोटी रूपये आ. सुनील देशमुख यांनी सुचविलेल्या कामांवर खर्च करण्यात यावा, असे पत्र नगरविकास विभागाने दिले आहे. त्यानुसार या उभय आमदारांनी सुचविलेल्या कामांवर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. १.७५ कोटी रुपयांमधून सावता मैदान बडनेरा येथे सांस्कृतिक भवन तर ३.२५ कोटी रुपयांमधून राजकमल चौक ते अंबागेट या रस्त्याची कामे होणार आहे. या कामांसाठीही सार्वजनिक बांधकाम विभागच कार्यान्वयन यंत्रणा राहणार असल्याने पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ताधीश आणि उभय आमदारांमध्ये धुमश्चक्री रंगणार आहे. रस्ते अनुदानातून होणाऱ्या कामासाठी महापालिका एनओसी देणार नाही, असा ठाम पवित्रा स्थायी समितीने घेतला असताना पुन्हा एकदा आमदारांनी पाच कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. (प्रतिनिधी)
विशेष अनुदानातून होणारी कामे
शहरी भागातील पाणीपुरवठा व मलनिस्सारण, रस्ते, पदपथ, पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, शहरात पथदिवे, हायमास्ट लावणे, सामाजिक सभागृह, समाज मंदिर, व्यायाम शाळा, वाचनालय, समाजोपयोगी बांधकामे, महापालिका व्यापारी संकुल बांधणे, स्मशानभूमिची कामे, सुलभ शौचालय, प्रसाधनगृह बांधणे, ज्या झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याची शासनाची जबाबदारी आहे अशा ठिकाणी सार्वजनिक उपयोगाकरिता स्रानगृहे, संडास, पाणीपुरवठा व दिवाबत्ती अशी सामान्य स्वरुपाची कामे महानगरपालिका क्षेत्रात मोकळ्या जागेचे मैदानात, उद्यानात रुपांतर करणे, उद्यानाची श्रेणीवाढ करणे, शासनाच्या मान्यतेने घेतलेल्या नागरी सेवा व पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित इतर कोणतेही कामे.
९.३० कोटींची कामे ‘पीडब्ल्यूडी’कडे
९.३० कोटींच्या रस्ते अनुदानातील कामे कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. महापालिकेच्या आमसभेत मंजूर झालेली व नगरसेवकांनी सुचविलेली कामे यातून होणार आहे.
जिल्हास्तरीय समितीने आपला निर्णय बदलावा, पाच कोटी रुपये उभय आमदारांना एकाच वेळी देणार असेल तर महापालिकेला देय असलेला ५ कोटी रुपयांचा समभाग आम्ही देणार नाही. महापालिका मूलभूत आणि अन्य कामे ठरण्यास सक्षम आहे.
- अविनाश मार्डीकर,
सभापती, स्थायी समिती
सांस्कृतिक भवन बडनेऱ्याची निकड आहे. बडनेऱ्यावासीयांसाठी ती फार मोठी उपलब्धी ठरेल. मी आणि देशमुखांनी सुचविलेली दोन्ही कामे प्राधान्यक्रमानुसार करावीत, असे मुख्यमंत्र्यांचेच आदेश आहेत.
- आ. रवि राणा,
बडनेरा मतदारसंघ