रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर
By Admin | Updated: March 4, 2017 00:10 IST2017-03-04T00:10:12+5:302017-03-04T00:10:12+5:30
रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला.

रबीसाठी साडेपाच कोटींचा पीक विमा मंजूर
मार्चअखेर होणार बँक खात्यात जमा : गव्हाला ९, हरभऱ्याला १० तालुक्यात ठेंगा
अमरावती : रबी २०१५-१६ हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा काढलेल्या १५ हजार ८८९ शेतकऱ्यांपैकी १० हजार १९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ६४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. मार्च अखेरपावेतो बँकांद्वारा विमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल.
गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे सार्वत्रिक नुकसान झाले. मात्र भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व दर्यापूर तालुक्यात हरभऱ्यासाठी विमा मिळणार आहे. उर्वरित १० तालुक्यांना ठेंगा दाखविला आहे. गव्हासाठी अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा व वरूड तालुक्यातच विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित ९ तालुक्यांना डावलले गेल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. रबीत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना नुकसान भरपाई मिळावी, यासासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. यामध्ये बागायती गव्हाकरिता ७५ महसूल मंडळ व हरभरासाठी ६४ महसूल मंडळात ही योजना होती. यात हरभरा पिकासाठी अचलपूर तालुक्यात १६०, अंजनगाव ७०२, भातकुली २१०५, चांदूरबाजार ३३८, चिखलदरा १०९, दर्यापूर ७९४९, धामणगाव २४०, धारणी १, मोर्शी ३९ व वरूड तालुक्यात १५९ शेतकऱ्यांनी विमा काढला होता. गव्हासाठी अचलपूर तालुक्यात २८, अमरावती ३३९, अंजनगाव सुर्जी ४५, भातकुली ७०, चांदूरबाजार ५०, चांदूररेल्वे ३७०, चिखलदरा १३७, धामणगाव ३२६, मोर्शी ४०, नांदगाव खंडेश्वर १६१७, तिवसा ३५५ व वरूड तालुक्यात १९३ शेतकऱ्यांनी विमा काढला होता.
गव्हाला १० लाखांची विमा भरपाई
भातकुली तालुक्यात ७० शेतकऱ्यांना ५८ हेक्टरसाठी एक लाख ४५ हजार १५७, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना ३९ हेक्टर क्षेत्रासाठी २८ हजार ४५४, चांदूरबाजार तालुक्यात ५० शेतकऱ्यांना ४० हेक्टरसाठी एक लाख २२ हजार ३०७, चिखलदरा तालुक्यात १३७ शेतकऱ्यांना १२० हेक्टरसाठी ६ लाख ६१ हजार ९२१ व वरुड तालुक्यात १३० शेतकऱ्यांना २२० हेक्टरसाठी एक लाख १६ हजार १५५ रुपये असा एकूण १० लाख ७३ हजार ९९४ रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
कांदा, उन्हाळी
भूईमूग निरंक
उन्हाळी भूईमुगासाठी अंजनगाव सुर्जी व तिवसा तसेच कांद्यासाठी अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, धामणगाव, मोर्शी व तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रबी पीक विमा काढला होता. मात्र या तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला विमा मंजूर झालेला नाही. विम्यात कंपनीद्वारा फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.