सहकारातील ४७० संस्था अवसायनात
By Admin | Updated: December 17, 2015 00:30 IST2015-12-17T00:30:36+5:302015-12-17T00:30:36+5:30
बिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत.

सहकारातील ४७० संस्था अवसायनात
गजानन मोहोड अमरावती
बिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत. १ जुलै २०१५ पासून जिल्ह्यातील २ हजार ३४६ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधकाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत राबविण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार ३४६ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांचे ८४ टक्के कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा आॅक्टोबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बंदस्थितीत, कार्यस्थगित व कागदोपत्रीच असलेल्या ३६५ संस्था आढळून आल्यात. तसेच नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या व ठावठिकाणा नसलेल्या १०५ संस्था आढळून आल्यात. यापैकी ४७० संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यापैकी ४३६ संस्था अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहेत तर ८ संस्थांचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतूदीनुसार या सहकारी संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्था अवसायनात घेऊनत्यांची संख्या कमी केल्यामुळे सहकार विभागास नियोजनबध्द पध्दतीने कार्यरत संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देता येईल. जिल्ह्यात कृषी बँक, कृषी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणनसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती आहेत.