४.५० लाख विद्यार्थ्यांनी ऐकला पंतप्रधानांचा संवाद
By Admin | Updated: September 6, 2014 01:24 IST2014-09-06T01:24:01+5:302014-09-06T01:24:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पार पडले.

४.५० लाख विद्यार्थ्यांनी ऐकला पंतप्रधानांचा संवाद
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून खास विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पार पडले. या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय अशा २ हजार ८०५ शाळांपैकी २ हजार ७६० शाळांमधील सुमारे ४ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विद्यार्थ्यांशी शिक्षकदिन संवाद साधणार, या आशयाचे पत्र केंद्रीय शिक्षण सचिवांचे प्राप्त झाले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अशा २ हजार ८०५ शाळा सुरू आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक हजार ६०२ शाळा आणि १२०३, खासगी, अनुदानित, कायम विनाअनुदानित, शाळा अशा सर्वच शाळांमधील ५ लाख ५० हजार विद्यार्थी या संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती आहे. यासाठी टीव्हीपासून ते आसन व्यवस्था, इंटरनेट सुविधा, वीज पुरवठ्याची सुविधा नसल्यास जनरेटरची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी जिह्यातील सर्वच शाळांनी केली होती. दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. मात्र हा उपक्रम राबविताना काही शाळांमध्ये नियोजनाचा अभाव आढळून आल्याचे शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. मागील पाच दिवसांपासून शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी यासाठी आवश्यक उपायोजना केल्यात.