पश्चिम विदर्भात यंदा नैसर्गिक आपत्तीचे ४४ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:43 IST2019-08-22T16:43:11+5:302019-08-22T16:43:45+5:30
७,५३९ हेक्टर क्षेत्र बाधित : ४५ गंभीर जखमी, लहान-मोठी १०४ जनावरे मृत

पश्चिम विदर्भात यंदा नैसर्गिक आपत्तीचे ४४ बळी
अमरावती : यंदा जून कोरडाच गेला. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या ७५ दिवसांदरम्यान पश्चिम विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्ती मृत पावले. यापैकी ३६ प्रकरणांत १.४४ कोटींची मदत देण्यात आली. अद्याप ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. याच अवधीत लहान-मोठी १०४ जनावरे दगावली आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ७,५३९ हेक्टर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले.
विभागात १६ ऑगस्टपर्यंत नैसर्गिक आपत्तीचे सर्वाधिक १६ जणांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १०, अकोला ७, बुलडाणा ८ व वाशीम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये ११ व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर २३ जण वीज पडून ठार झालेत. आपत्तीच्या इतर कारणांनी १० व्यक्ती मृत झाल्या आहेत. यासाठी अमरावती जिल्ह्यात २० लाख, अकोला २० लाख, यवतमाळ ६४ लाख, बुलडाणा २८ लाख, तर वाशीम जिल्ह्यात १२ अशीे एकूण एक कोटी ४४ लाखांची मदत शासनातर्फे देण्यात आली आहे.
विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे ११७ जनावरे दगावली. यामध्ये मोठी दुधाळ ५९ जनावरे, २८ लहान दुधाळ, तर ओढकाम करणारी २५ मोठी व १३ लहान जनावरांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात एकूण २४ जनावरे नैसर्गिक आपत्तीत मृत पावली, अकोला जिल्ह्यात १०, यवतमाळ जिल्ह्यात ३५, बुलडाणा जिल्ह्यात ३४ व वाशीम जिल्ह्यात १३ जनावरांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात एकूण १९.५७ लाखांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्याने तसेच शेतात पाणी साचल्याने ७,५३९ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापैकी ४,०२२ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ४,१२३ हेक्टर क्षेत्र बुलडाणा, तर ३,३१९ हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यातील आहे.
३,९४४ घरांची, १०० गोठ्यांची पडझड
पावसाळ्याच्या या अडीच महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात ३,९४४ घरांची पडझड झाली. यासाठी ६.५७ लाखांचे सानुग्रह अनुदान बाधितांना देण्यात आले आहे. यामध्ये पूर्णत: पडझड झालेली २५३ घरांचा समावेश आहे. अंशत: ३६६७ व नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या १७ आहे. तसेच वाशीम वगळता अन्य चार जिल्ह्यांतील १०० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या व्यतिरिक्त २ सार्वजनिक मालमत्ता व ७९ खासगी मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.