४३९ संस्था निघणार अवसायनात
By Admin | Updated: October 4, 2015 00:56 IST2015-10-04T00:56:08+5:302015-10-04T00:56:08+5:30
बिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

४३९ संस्था निघणार अवसायनात
लोकमत विशेष
गजानन मोहोड अमरावती
बिनकामाच्या, ठावठिकाणा नसणाऱ्या व केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या ४३९ सहकारी संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. १ जुलैपासून सहकार विभागाने जिल्ह्यातील २३५१ सहकारी संस्थाचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशा संस्थांना आता निबंधकाद्वारा समापन करण्यात येऊन चालू असणाऱ्या संस्थांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहायक निबंधकांच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांचे सर्वेक्षण विशेष मोहिमेद्वारे १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ३५१ सहकारी संस्थाचे ८४ कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा ३० सप्टेंबरपर्यंत ९९ टक्के म्हणजेच २ हजार ३२१ संस्थांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये केवळ १ हजार ८८२ संस्था चालू स्थितीत आढळल्यात, २३६ संस्था बंद आहेत, ८९ संस्थांचे कार्य स्थगित आहे, तर ११४ संस्थांचा ठावठिकाणा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आढळून आलेला नाही. अशा एकूण ४३९ संस्था आता अवसायनात काढण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतुदीनुसार या कागदोपत्री सहकारी संस्थांवर ही कारवाई केली जाणार आहे.