१३० दिवसांत ४,०२४ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:49+5:30

जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर २१ एप्रिलला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतरच्या १३० दिवसांत चार हजारांवर रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या नोंद होणारे ८० टक्के रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर कुठलेही लक्षण नसल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.

4,024 patients corona free in 130 days | १३० दिवसांत ४,०२४ रुग्ण कोरोनामुक्त

१३० दिवसांत ४,०२४ रुग्ण कोरोनामुक्त

ठळक मुद्दे१,२८९ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण : जिल्ह्यात महिनाभरात ३,८८७ संक्रमितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आतापर्यत चार हजारांवर कोरोनाग्रस्तांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आल्याची सुखद वार्ता आहे. सध्या १२८९ अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या कित्येक पटींनी जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. या महिनाभरात कोरोनाची ‘पीक’ स्थिती असल्याने तब्बल ३७०० रुग्णांची नोंद झाली, ही मात्र, चिंतेची बाब आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिलला झाल्यानंतर २१ एप्रिलला पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यानंतरच्या १३० दिवसांत चार हजारांवर रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने संक्रमनमुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या नोंद होणारे ८० टक्के रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. त्यामुळे चार दिवसांच्या उपचारानंतर कुठलेही लक्षण नसल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस मात्र होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. याशिवाय असिम्प्टमॅटिक रुग्णांसाठी आता होम आयसोलेशनची सुविधादेखील उपलब्ध आहे. महापालिका क्षेत्रात आतापर्यत ४५० रुग्णांनी या सुविधेचा फायदा घेतला आहे.
संक्रमितांच्या वाढत्या संख्येमुळे आता कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या वर्गीकरणात दाखल करण्यात येत आहे; तथापि काही लक्षणविरहीत रुग्णांच्या घरी योग्य सुविधा असल्यास त्यांना त्यांच्या संमतीनुसार होम आयसोलेशनची सुविधा देण्यात येत आहे. यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असल्याबाबत प्रमाणित केले असावे. त्यांच्या घरी विलगीकरणासाठी व कुटूंबातील व्यक्तींच्या विलगीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, ही अट आहे. यासह अन्य कागदपत्रांची पुर्तता त्यांना करावी लागते. याशिवाय आरोग्य विभागाच्या हेल्पलाईनद्वाराही फोनद्वारे त्यांच्याशी सातत्याने संपर्क करण्यात येतो.

आतापर्यत ३६ हजारांवर चाचण्या निगेटिव्ह
जिल्ह्यात २८ ऑगस्टपर्यत ४२ हजार ४३९ कोरोना संक्रमण चाचण्या करण्यात आल्या. यापैकी ३६१५१ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७६६ अहवाल प्रतीक्षेत आहेत. २३९ अहवाल पुन्हा पाठविण्यात येणार आहेत. याशिवाय ट्रुनेटद्वारा आलेलेले ७५ अहवाल हे आरटी-पीसीआर तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक २७०३० चाचण्या आरटी-पीसीआर आहेत. खासगी लॅबद्वारा ३६०, रॅपीड अ‍ॅन्टीजेनद्वारा महापालिका क्षेत्रात १०,३२९ व जिल्हा ग्रामीणमध्ये ४३३३,याशिवाय ट्रुनेट मशीनद्वारा ३८७ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत.

ऑगस्टमध्ये सर्वाधिक रुग्ण
ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ग्रामीणमध्येही याच महिन्यात संक्रमितांची संख्या वाढायला लागली. १ ऑगस्टला जिल्ह्यात २१५७ संक्रमितांची नोंद होती. २९ आॅगस्टला ही संख्या ५४४० वर पोहोचली. या महिन्यात सरासरी १३० वर संक्रमितांची नोंद झाली. एकाच दिवशी सर्वाधिक २०६ रुग्णसंख्येचा उच्चांकही याच महिन्यातील आहे.

Web Title: 4,024 patients corona free in 130 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.