४०० किलो कागदी लगद्यापासून साकारला १६ फुटांचा गणपती
By Admin | Updated: May 25, 2016 00:46 IST2016-05-25T00:46:09+5:302016-05-25T00:46:09+5:30
स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी ४०० किलो कागदाचा लगदा आणि ६५० किलो मैद्याच्या चिक्कीचा वापर करून भिंतीवर चक्क १६ फुटांच्या गणपतीची प्रतिमा साकारली.

४०० किलो कागदी लगद्यापासून साकारला १६ फुटांचा गणपती
स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विक्रम : ‘लिम्का बुक’ला पाठविले रेकॉर्डिंग
अमरावती : स्थानिक स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी ४०० किलो कागदाचा लगदा आणि ६५० किलो मैद्याच्या चिक्कीचा वापर करून भिंतीवर चक्क १६ फुटांच्या गणपतीची प्रतिमा साकारली. ही देशातील सर्वात मोठी प्रतिमा असल्याचा दावा स्कूल आॅफ स्कॉलर्सने केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे.
सोमवारी दहा जणांच्या कला पथकला ही प्रतिमा भिंतीवर साकारण्यासाठी ७ तास ३० मिनिटांचा कालावधी लागला. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी यासाठी लिम्का बुककडे नोंदणी करून घेतली होती. त्याला मान्यताही मिळाली होती. एसओएसचे दोन कलाशिक्षक व आठ विद्यार्थ्यांच्या चमूने सकाळी ८.५० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत न थांबता ही विशाल प्रतिमा तयार केली. या विक्रमाचे निरीक्षक म्हणून शहरातील विविध विभागात कार्यरत राजपत्रित अधिकारीदेखील याठिकाणी उपस्थित होते.
या विक्रमाचे पूर्ण व्हिडीओ शूटिंगदेखील करण्यात आले. हे फुटेज आता लिम्का बुककडे पाठविली जाणार आहे. त्यानंतरच ही देशातील सर्वात मोठी गणपती प्रतिमा आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल. यासाठी शाळा व्यवस्थापनाला ३५हजार रूपये खर्च आला. याप्रसंगी सहायक शिक्षणाधिकारी जयश्री घारफळकर, लता सोनारकर, पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश मावस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन उंडे, प्राचार्य सुरेश लकडे, उपप्राचार्य समीधा नाहार, हरिहर जिराफे, विनोद इंगोले, मुख्याध्यापिका प्रिया कडू, डीवायएसपी ग्रामीण सुगंधी, एस.आर.धुर्वे, प्राचार्य देशमुख, नीलय वासाडे, पांडुरंग काळमेघ, अजय सोळंके, रिना रोहणकर, दिलीप तिडके, नीरज डाफ, गणेश विश्वकर्मा उपस्थित होते.
विक्रमात यांचा होता सहभाग
कुणाल राजणेकर व रूपेश भेले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी अनुदय पर्वतकर, स्वानंद जाजू, प्रियांक धरमशी, जयवंत इंगळे, आकाश अवघड, साहिल घुबळे, अथर्व जोशी आणि प्रतिक सुगंधी यांनी मागील १५ दिवसांपासून सतत प्रयत्न करून ४०० किलो कागद गोळा करून ही प्रतिमा साकारली.