४०० नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

By Admin | Updated: July 7, 2015 00:16 IST2015-07-07T00:16:07+5:302015-07-07T00:16:07+5:30

प्रस्तावित समाज मंदिराच्या जागेवर नगरपरिषदेच्या काही कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या अतिक्रमित बांधकामाकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने

400 citizens' municipal elections | ४०० नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

४०० नागरिकांचा नगरपालिकेवर मोर्चा

अतिक्रमणाचा मुद्दा चिघळला : अतिक्रमण केलेले बांधकाम तोडले
सुनील देशपांडे अचलपूर
प्रस्तावित समाज मंदिराच्या जागेवर नगरपरिषदेच्या काही कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या अतिक्रमित बांधकामाकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याने काही युवकांनी हल्लाबोल करून अतिक्रमित बांधकाम तोडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला पांगविले. ही घटना परतवाडा येथील देशमुख प्लॉट भागात घडली.
देशमुख प्लॉट शिट नं. २० डी प्लॉट नं. १४४ या अधिन्यासातील एका भागात बुनकर समाजाचे हनुमान मंदिर असून प्रस्तावित समाज भवनासाठी जागा आहे. तेथे गेल्या १० ते १५ वर्षापासून ८-१० लोक अतिक्रमण करून रहात आहे. ते अतिक्रमण हटवावे यासाठी या भागातील लोक गेल्या तीन-चार वर्षांपासून नगरपरिषदेकडे तक्रारी अर्ज करीत असून नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. अतिक्रमित बांधकाम करून राहत असलेल्या ठाकूर नामक व्यक्तीच्या घराची भिंत पडल्याने त्याने ती भिंत बांधण्यासाठी टिनपत्रे व बांधकामाचे साहित्य आणले होते. त्या भिंतीसाठी पाया खोदला होता. शनिवारी रात्री अचानक देशमुख प्लॉट भागातील ५० ते ६० युवकांनी एकत्र येऊन बांधकामाच्या ठिकाणी हल्लाबोल केला. बांधकामाच्या सामानाची फेकाफेक केली त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार गिरीष बोबडे यांना मिळताच त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले त्यामुळे पुढील अप्रिय घटना घडली.

जागेची पार्श्वभूमी
सदर जागा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित होती. ती बुनकर समाजाच्या विकास कामांसाठी मिळाली होती. या जागेवर जय हनुमान संस्थेद्वारे मुलांसाठी बगिचा व मैदान करण्याचे नियोजन करण्यात आले असून यावर नगरपरिषद कर्मचारी ईश्वर साखरे यांचेसह आठ जण अतिक्रमणधारक आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी २०११ मध्ये नगरपरिषदेकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर तक्रारींचा पाठपुरावा सुरूच होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी यांचेसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते.

अघोषित मोर्चा धडकला पालिकेवर
आज ४०० पेक्षा जास्त महिला-पुरूषांनी सामाजिक कार्यकर्ते उत्तम साखरे यांच्या नेतृत्वात देशमुख प्लॉट परतवाडा येथून अघोषित मोर्चा काढला. नगरपरिषदेवर घोषणा देत मोर्चा आल्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी मुश्ताक अली यांना निवेदन देण्ळात येऊन अतिक्रमण तोडण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकरी व नगर अभियंता जोशी यांच्यात थोडी गरमागरमीही झाली.

पोलीस पोहोचताच तणाव निवळला
देशमुख प्लॉट भागात प्रस्तावित समाज भवनाच्या बांधकामाच्या ठिकाणी येथील काही युवकांनी हल्लाबोल केला. घटनास्थळी असलेल्या साहित्याची फेकफाकही केली. परंतु शहरात अप्रिय घटना घडत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणावाची स्थिती निवळली.

येथील अतिक्रमणधारक व हनुमान मंदिराचे विश्वस्त एकाच समाजाचे आहेत. शनिवारी रात्री अतिक्रमणावरून मोठा वाद झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तो निवळला. अतिक्रमण हटवायचे असल्यास नियमाने हटवले गेले पाहिजे. हल्लाबोल वगैरे प्रकार झाल्यास कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य कोणी करू नये. यासंदर्भात कोणावरही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत.
-गिरीश बोबडे,
ठाणेदार, परतवाडा.

ह्या अतिक्रमणाबाबत चौकशी करण्यात येऊन फौजदारी करण्यात येईल. न्यायालय जो निर्णय देईल तो आपण मान्य करू. दरम्यान नगरपरिषदेजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- मुश्ताकअली,
प्रभारी मुख्याधिकारी.

Web Title: 400 citizens' municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.