४ हजार हेक्टर गहू बाधित
By Admin | Updated: February 13, 2015 00:47 IST2015-02-13T00:47:19+5:302015-02-13T00:47:19+5:30
जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट..

४ हजार हेक्टर गहू बाधित
लोकमत विशेष
अमरावती : जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या अन्वये बाधित क्षेत्रातील किमान ५० टक्के नुकसान गृहीत धरल्यास गहू पिकाचे ५ कोटी ४० लाखांवर नुकसान झाले. सोबत संत्रा, आंबा, कपाशी व भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वादळासह पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू नाही. अधिकारी व कर्मचारी हे जलयुक्त शिवार अभियानाच्या १३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाला व रात्री ‘गाव मुक्कामाला’ राहणार आहे. परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्याची वानवा असल्यामुळे शेतीपीक नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले नाही, ही वस्तूस्थिती आहे.
ओंबीवर आलेला गहू जमिनीवर पडल्याने बाधित क्षेत्रामधील गव्हाचा दाणा बारीक पडणार आहे. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर झाले. हरभऱ्याचे फारसे नुकसान नाही. या पावसाचा हरभऱ्याला फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कापणीवर व मळणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापणी झालेल्या तुरीच्या गंजी ओल्या झाल्यात. वादळामुळे झाडावरील संत्रा फळे पडली आहे. आंब्या मोहोराचे व भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपानंतर रबीचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्हाधिकारी करणार पाहणी
वादळवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले. ओंबीवर आलेला गहू जमिनदोस्त झाला. संत्र्याची फळे पडली. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी शनिवार १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी किरण गित्ते करणार असल्याची माहिती आमदार अनिल बोंडे यांनी दिली.
सर्वेक्षणास कर्मचाऱ्याअभावी खोळंबा
जलयुक्त शिवार अभियानासाठी अन्य विभागासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची गुरूवारला बैठक, प्रशिक्षण व रात्री ‘गाव मुक्काम’ असल्याने हे कर्मचारी व्यस्त आहेत. परिणामी नुकसान क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सर्वेक्षणाचा खोळंबा झाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
नापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी अति पावसाने यंदा पावसाअभावी पीक उद्धवस्त झाले. रबीवर आशा असताना वादळवाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.