दिव्यांग बालकांना ‘आरटीई’ प्रवेशात ४ टक्के आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:44+5:302021-03-18T04:13:44+5:30
अमरावती: आरटी प्रवेश प्रक्रिया राबवत असताना दरवर्षी काही नवनवीन बदल करण्यात येतात. यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग विद्यार्थ्याना ...

दिव्यांग बालकांना ‘आरटीई’ प्रवेशात ४ टक्के आरक्षण
अमरावती: आरटी प्रवेश प्रक्रिया राबवत असताना दरवर्षी काही नवनवीन बदल करण्यात येतात. यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग विद्यार्थ्याना ४ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना आता आरटीई प्रवेशात हक्काच्या जागा मिळणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालकांनी यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात बदलाविषयी माहिती दिल्याचे येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. यंदापासून प्रत्येक शाळेत आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी ४ टक्के जागा या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्याना २५ टक्के राखीव असणाऱ्या जागांवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार पालकांना २१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे अर्ज भरता येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३५०० हून अधिक विद्यार्थ्याचे अर्ज आले आहेत. अद्यापही प्रवेश अर्ज भरण्यासाठी ४ दिवसांची अवधी शिल्लक असतानाच पालकांच्या मोबाइलवर ओटीपी क्रमांक मिळण्यात अडचणी येत होत्या. तांत्रिक समस्या दूर झाल्यानंतर पालकांना आता अर्ज भरण्याची सूचना देण्यात आली आहे. दरम्यान यंदा शाळा वाढल्या असल्या तरी प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत. तरीदेखील जिल्ह्यात २ हजार ७६ जागांसाठी विद्यार्थ्याच्या अर्जाची संख्या ४ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बॉक्स
या बाबी महत्त्वाच्या
यंदा एकच लॉटरी निघणार
१५ जानेवारीपर्यंत सहा वर्ष पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश
वास्तव्य असलेल्या गुगल लोकेशन बंधनकारक
लॉटरी प्रवेश जाहीर झालेल्यांना तीन संधी
प्रवेशावेळीच कागदपत्रे सादर करण्याची मुभा
दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षकांची प्रमाणपत्र बंधनकारक
कोट
आरटीई प्रवेशाकरिता सध्या ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यंदा प्रथमच आरटीई प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग पाल्यांना ४ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित घटकांकरिता नियमानुसारच प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाईल.
ई.झेड. खान
शिक्षणाधिकारी प्राथमिक