३९ गावे नळांविना!
By Admin | Updated: December 14, 2015 00:19 IST2015-12-14T00:19:43+5:302015-12-14T00:19:43+5:30
तालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील...

३९ गावे नळांविना!
अचलपूर तालुक्यातील प्रकार : १४५ गावांना नळयोजनेतून पाणीपुरवठा
सुनील देशपांडे अचलपूर
तालुक्यातील ३८ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या गावांना हातपंपाने पाणीपुरवठा सुरू आहे. हातपंपाने होणारा पाणीपुरवठ्यात शुद्धीकरण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने येथील नागरिकांना जलजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. त्यापैकी ४८ गावे उजाड आहेत. सध्या १३६ गावे आबाद आहेत. बहुतांश गावांत रस्ते, स्वच्छता, सांडपाण्याची समस्या आहे. पंचायत समितीअंतर्गत ७० ग्रामपंचायती येतात. गावातील पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. १४५ गावांना नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातील ३५ गावांमध्ये विद्युत पुरवठ्यावर चालणाऱ्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यात पाणीसाठा विपुल असला तरी ग्रामीण भागात वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा व लोकप्रतिनिधींचे ग्रामीण भागांकडे होणारे दुर्लक्ष, यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३८ गावांना बाराही महिने हातपंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची तहान भागवावी लागत आहे. तालुक्यात जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने क्षारयुक्त पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. उन्हाळ्यात तालुक्यात पाणीप्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाळयात भीषण पाणीटंचाई
पाणीसाठा मुबलक असला तरी उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात असल्याने काही गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. काही वेळा हातपंपांना पाणी येणे बंद होते. खोल पाणी उपसले जात असल्याने हातपंपात बिघात होऊन ते बंद पडतात. परिणामी पाणीटंचाई निर्माण होते. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला सहन करावा लागतो.
सौर ऊर्जेवरील हातपंप
अचलपूर पंचायत समितीअंतर्गत जलालपूर व कुंभी उडाण या दोन गावांतील हातपंपामधील पाणी काढण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पावसाळ्यात सूर्यनारायणाने दर्शन देणे बंद केले की, समस्या निर्माण होते. तालुक्यात हातपंपांची संख्या ४२७ असून खानापूर, चांदुरा, जहागीर, औरंगापूर उडाण, जवळापूर, शेकापूर, वडुरा, जलालपूर, शंकरपूर, शहापूर यांसह ११ गावांत दुहेरी हातपंप आहेत. ११० गावांत कायमस्वरुपी पाणीपुरवठ्याची नळयोजना असल्याचा दावा पंचायत समितीतर्फे केला जात आहे.