चांदूर उपविभागात ३९ कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:09+5:302021-05-07T04:13:09+5:30

पान २ चे लिड धामणगाव रेल्वे : उपविभागातील तिन्ही तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने ३९ कंटेनमेंट झोनची निर्मिती ...

39 containment zones in Chandur subdivision | चांदूर उपविभागात ३९ कंटेनमेंट झोन

चांदूर उपविभागात ३९ कंटेनमेंट झोन

पान २ चे लिड

धामणगाव रेल्वे : उपविभागातील तिन्ही तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने ३९ कंटेनमेंट झोनची निर्मिती करण्यात आली आहे. या कंटेनमेंटमधून विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीवर आणि पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर दिसल्यास फौजदारी कारवाईचे निर्देश चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ धामणगाव तालुक्यात झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर चांदूर रेल्वे तालुका आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय प्रशासनाकडून कडक पाऊल उचलले जात आहे. तीनही तालुक्यांत सनियंत्रण समितीची स्थापना केली आहे. दररोज पॉजिटिव्ह रुग्णांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या रुग्णांसोबत फोनवर बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारणा या समितीला करावी लागत आहे. गृह विलगिकरणात असलेल्या रुग्णाकडून बंधपत्र लिहून घेतले जात आहे. मला स्वतंत्र रूम आहे. मी दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही, असे बंध पत्रकात नमूद करण्यात येते.

धामणगाव तालुक्यात सर्वाधिक कंटेनमेंट झोन

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवनगाव, नांदगाव खंडेश्वरमध्ये वाॅर्ड क्रमांक १५, १६, हिवरा बुद्रुक, धामणगाव तालुक्यात गव्हा फरकाडे, हिरपूर, बोरगाव धांदे, गोकुळसरा, तळणी, चिंचोली, अशोकनगर, झाडगाव, सोनेगाव खर्डा, आसेगाव, जुना धामणगाव चिंचोली, तर शहरात गोयनका नगर, लुनावत नगर, भागचंद नगर असे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात नया सांवगा, शहरात पात्रीकर कॉलनी, रामनगर, गांधी चौक, साईनगर, क्रांती चौक, शिवाजी नगर, मंगलमूर्ती नगर भगवान चौक, तर तालुक्यात पळसखेड, मालखेड, कारला, कळमगाव, मालखेड, धनोडी, घुईखेड, जळका जगताप ही गावे कोरोनाने संक्रमित झाली आहेत.

आता दोन्ही वेळा होणार चाचणी

चांदूर धामणगाव या दोन्ही तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ज्या गावात पाचपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळली, त्या गावात किमान दोनशे चाचण्या एकाच दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी सकाळी ७ ते ११, तर दुपारी ४ ते ६ पर्यंत या चाचण्या घेण्यात येणार आहे. गावातील किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, भाजीविक्रेते यांनी १५ दिवसांतून एकदा तपासणी करणे बंधनकारक असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.

१५० शाळांच्या खोल्या रुग्णां’साठी उपलब्ध

धामणगाव व चांदूर रेल्वे तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणात ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे संबंधित गावांच्या शाळेत व्यवस्था करण्यात येणार आहे. दरम्यान या रुग्णांना स्वतःच्या घरून टिफीन देता येणार आहे, असे रुग्ण गावात फिरताना दिसल्यास पोलीस पाटलांनी त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास थेट पोलीस पाटलावर कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिले.

Web Title: 39 containment zones in Chandur subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.