जंगलात चराई करणाऱ्या गावकऱ्यांना ३८ हजारांचा दंड
By Admin | Updated: August 13, 2014 23:36 IST2014-08-13T23:36:04+5:302014-08-13T23:36:04+5:30
वडाळीच्या जंगलात जनावरे चराईसाठी सोडणाऱ्या गावकऱ्यांवर वनविभागाने कारवाई करुन ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे.

जंगलात चराई करणाऱ्या गावकऱ्यांना ३८ हजारांचा दंड
अमरावती : वडाळीच्या जंगलात जनावरे चराईसाठी सोडणाऱ्या गावकऱ्यांवर वनविभागाने कारवाई करुन ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे.
जंगल भागात चराई करण्यास वनविभागाने बंदी केली आहे. मात्र काही गावालगतच्या वन जमिनीवर गावकरी मनमानी करीत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान वनविभागाने वडाळी व भानखेडा वनपरिक्षेत्रात जनावरे चराईसाठी सोडल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये प्रतीगुरांप्रमाणे १ हजार रुपयांचा दंड वनविभागाने वसूल केला. वडाळी वनपरिक्षेत्रातील भानखेडा व वडाळी भागात वृक्ष लागवड करण्यात आली असून त्या भागात जनावरांना चराईसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही या जंगलात जनावरे चराईसाठी सोडली जातात. ही माहिती चौकीदारकडून वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी. के. लाकडे यांना मिळाली.
त्यानुसार वर्तळाधिकारी विजय बारब्दे, वनरक्षक एच. एम. आवणकर, नीलेश करवाळे, व्ही. डब्ल्यू. खैरकर, एफ.ई. सगणे व ओंकार भुरे यांच्या पथकाने चराई होत असलेल्या भागात धाड टाकून काही गावकरी व त्यांची गुरे ताब्यात घेतली. सुदर्शन गोफणे (वडाळी), यांच्याकडून २१ हजार, सतीश यादव (भानखेडा) यांच्याकडून ४ हजार तर उमेश ठाकुर यांच्याकडून १३ हजारांचा दंड वनविभागाने वसूल केला आहे. (प्रतिनिधी)