कृषी योजनांसाठी १,७८४ शेतकऱ्यांना ३.६२ कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:16+5:302021-07-28T04:13:16+5:30
अमरावती : कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याकरिता महाडीबीटी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये ...

कृषी योजनांसाठी १,७८४ शेतकऱ्यांना ३.६२ कोटींचे अनुदान
अमरावती : कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्याकरिता महाडीबीटी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील ३,३८,३३६ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यांपैकी ५८,८४० शेतकऱ्यांची लॉटरीद्वारा निवड करण्यात आली. यामध्ये सद्य:स्थितीत १,७८४ जणांना तीन कोटी ६१ लाख ९७ हजारांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
या पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली त्यांच्या पसंतीच्या योजना निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. यामध्ये अमरावती विभागात कृषी यांत्रिकीकरणासाठी १,२३,९२९ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यांपैकी ५,८२४ शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. प्रत्यक्षात १८७ अर्जच अनुदानासाठी ऑनलाईन प्रोसेसमध्ये आहेत. यामध्ये आतापर्यंत १६२ शेतकऱ्यांना ८६ लाख चार हजार ७५३ रुपये अनुदानाचा लाभ देण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती योजनेत २६,७७९ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ५,८६६ शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये ४,१९९ अर्ज प्रोसेसमध्ये आहे. प्रत्यक्षात ४१ शेतकऱ्यांना ७३ लाख १७ हजार २८७ रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
बॉक्स
२३,७७१ अर्ज रद्द होण्याची शक्यता
ऑनलाईन लॉटरीद्वारे ५८,८४० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ४,३३६ अर्ज रद्द झालेले आहेत. याशिवाय २३,७७१ शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत; त्यामुळे हे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरून त्यांची नावे रद्द करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
बॉक्स
सिंचन योजनांसाठी २.०२ कोटींचे अनुदान
विभागात सिंचन सुविधा व साधनांकरिता १,२५,६९५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. यांपैकी ४६,७२० जणांची ऑनलाईन लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. यात २,०५० अर्ज रद्द झाले. अद्यापही १८,३०८ शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. सद्य:स्थितीत १,५८१ शेतकऱ्यांना २,०२,७५,०७४ रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.