११ लाख पशुधनाला ३६ हजार मे.टन वैरणची तूट; रोज ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 10, 2024 23:38 IST2024-05-10T23:35:08+5:302024-05-10T23:38:22+5:30
रखरखत्या उन्हाळ्याचे दोन महिने कठीणच

११ लाख पशुधनाला ३६ हजार मे.टन वैरणची तूट; रोज ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज
गजानन मोहोड, अमरावती: गतवर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. सध्या दर महिन्याला १८ हजार मे.टन वैरणीचा तुटवडा पडत असल्याने पशुपालकांवर चांगलाच ताण आलेला आहे. प्रशासनाने उशिरा घेतलेल्या आढाव्याशिवाय फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शिवाय चाऱ्याचे मागणी अर्ज प्राप्त नसल्याचे सांगत पशुसंवर्धन विभागाने हात झटकले आहेत.
जिल्ह्यात लहान-मोठे असे एकूण १०,१७,८१७ पशुधन जिल्ह्यात आहे. यावर्षी सोयानीन, हरभरा, तुरीच्या कुटाराची कमतरता आहे. या पशुधनाला दरदिवशी किमान ३४६२ मे.टन चाऱ्याची गरज आहे. सोबतच हिरवा चारा देखील आवश्यक आहे. मात्र, सर्वत्र रखरखते असल्याने रानावनात चारा नाही. शिवाय साठवणूक केलेली वैरण संपल्यात जमा आहे. काही शेतकऱ्यांनी थोडीफार चाऱ्याची साठवणूक पेरणी काळात बैलजोडीसाठी केलेली आहे. नवीन चारा तयार व्हायला किमान दोन ते अडीच महिन्यांचा अवधी आहे. या कालावधीत पशुधन कशी जगवावी, हा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे.
असा लागतो रोजचा चारा!
जिल्ह्यात पशुधनाला रोज ३४६१.८४ मे.टन चारा लागतो. यामध्ये अमरावती २७८.५७ मे. टन, अंजनगाव सुर्जी १७८.८०, अचलपूर ३९५.३७, भातकुली १४४.१२, चांदूर बाजार २१४.५४, चांदूर रेल्वे १८५.७६, धामणगाव २२२.९८,धारणी ३७१.३७, दर्यापूर २११.५७, चिखलदरा ३६९.६७, मोर्शी २५१.३९, तिवसा १७७.१४, वरुड २५०.२८ व नांदगाव तालुक्यात २१०.२१ मे. टन चारा लागतो.