३५० शाळांची वीज तोडली!

By Admin | Updated: February 22, 2015 00:04 IST2015-02-22T00:04:41+5:302015-02-22T00:04:41+5:30

विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे, यातून पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जातात.

350 schools broke power! | ३५० शाळांची वीज तोडली!

३५० शाळांची वीज तोडली!

लोकमत विशेष
गजानन मोहोड अमरावती
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे, यातून पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेत ‘ई’ लर्निंगसोबत संगणक प्रयोगशाळाही सुरु करण्यात आल्या. मात्र शाळांद्वारा वीज देयक भरण्यात न आल्याने महावितरणने शाळांची वीज खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील किमान २५ टक्के शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने संगणक धूळखात व उकाड्याने शिक्षक, विद्यार्थी घाम पूसत आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत पूर्व माध्यमिक साळा प्राथमिक उच्च प्राथमिक अशा १६०२ शाळा आहेत. परंतु या शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम होऊन अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. दरवर्षी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत आहे. या स्पर्धेत मागे राहू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काही प्रमुख शाळांमध्ये ‘सेमी इंग्रजी’ अभ्यासक्रम सुरु केला आहे. काही वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत काही शाळांत संगणक प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्यात.
शाळांना वार्षिक ५ ते १० हजाराचे अनुदान
जि. प. अंतर्गत शाळांना वर्षभऱ्यातून एकदा ५ ते १० हजारांचे अनुदान मिळते. यामध्ये शाळांना शैक्षणिक साहित्य ग्रंथालय, शाळेसाठी आवश्यक स्टेशनरी, पाण्याचे बील तसेच ईलेक्ट्रीकचे बिल भरावे लागते. यापूर्वी कमी बिल यायचे आता मात्र वीज बिलाचा आकडा हजारोच्या घरात असल्याने शाळांना वीज बील भरणे शक्य होत नाही.
जि.प. अंतर्गत १६०२ शाळा
जि. प. अंतर्गत १६०२ पूर्व माध्यमिक, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा आहेत. १५०० शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. या शाळांमध्ये किमान १० हजार वर्गाखोल्या आहेत. मात्र खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना समस्या भेडसावत आहे.
देखभाल दुरुस्ती निधीत तरतूद हवी
शाळांना वार्षिक अनुदानाप्रमाणेच देखभाल दुरुस्तीसाठी दहा हजारांपर्यंत निधी मिळतो. यामधून शाळांची आवश्यक ती दुरुस्ती ‘रंगरंगोटी’ कामे करण्यात येतात. या निधीमधून वीज बिल भरण्याची तरतूद नाही. मात्र अलीकडेच अशी मुभा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: 350 schools broke power!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.