33,500 hens in Bhankheda area destroyed scientifically | भानखेडा परिसरातील ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट

भानखेडा परिसरातील ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट

ठळक मुद्देबर्ड फ्लू प्रतिबंधक कारवाई, १० किमी परीघ सर्वेक्षण क्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांत बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे ३३,५०० कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया रविवारी पूर्ण करण्यात आली.  नुकसानग्रस्त पोल्ट्रीधारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी ९० रुपये प्रतिपक्षी सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धिमान पोल्ट्री फार्मवरील  कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून यानंतर तपासणी होऊन या परिसरातील एक कि. मी. त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. संसर्गजन्य आजार प्रतिबंध कायद्यान्वये ३३,५०० कोंबड्या रविवारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या. बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलावू नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती. पोल्ट्रीधारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश   दिले. उपविभागीय अधिकारी राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सहायक आयुक्त कावरे, अवघड, पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुट पक्ष्यांना नष्ट करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. या कामासाठी दीडशे पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ३२ पथके तैनात करण्यात आली होती. यात सतीश गोळे यांच्या पोल्ट्री फार्ममधील २९ हजार कोंबड्या व   मेश्राम यांच्या ४ हजार ५०० कोंबड्या नष्ट करण्यात आल्याचे गोहोत्रे यांनी सांगितले.
पोल्ट्री फार्म संचालकांना सानुग्रह अनुदान
पोल्ट्री फार्ममधील एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा तयार करण्यात आला. त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामग्री टाकून पक्ष्यांना टाकले व  सदर खड्डा बुजविण्यात आला. एक किलोमीटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा ९० दिवसांसाठी सीलबंद राहील. नष्ट केलेल्या कोंबड्यांचे ७० रुपये प्रतिपक्षी व खाद्यघटक २० रुपये प्रतिपक्षी असे ९० रुपये प्रतिपक्षी दराने सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसानभरपाई शासनाकडून देण्यात येणार असल्याचे डॉ. गोहोत्रे यांनी सांगितले.

 

Web Title: 33,500 hens in Bhankheda area destroyed scientifically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.