३१ डिसेंबर : 'आॅपरेशन आॅल आऊट'
By Admin | Updated: December 28, 2016 01:37 IST2016-12-28T01:37:01+5:302016-12-28T01:37:01+5:30
नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पुन्हा ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबविण्यात येणार आहे.

३१ डिसेंबर : 'आॅपरेशन आॅल आऊट'
पोलिसांचा बंदोबस्त : ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’, स्टंटबाजांवर लक्ष
अमरावती : नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पुन्हा ‘आॅल आऊट आॅपरेशन’ राबविण्यात येणार आहे. ३० व ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ही मोहीम राबविली जाणार असून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या स्टंटबाज दुचाकीस्वारांवर पोेलिसांची विशेष नजर राहणार आहे.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी अशी एकूण ६० टक्के पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहे. पूर्वीप्रमाणेच ‘आॅल आऊट आॅपरेशन’ द्वारा वाहनांची तपासणी करून नियमबाह्य वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाईल. यंदा नववर्षाच्या स्वागतासाठी वेळेची मर्यादा वाढविण्यात आल्यामुळे नववर्षाचा जल्लोष मध्यरात्रीपर्यंत साजरा करता येणार आहे. मात्र, या उत्साहाला गालबाट लागू नये, याकरिता पोलिस यंत्रणा सतर्क राहणार आहे. शहरातील दहाही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ मोहीम राबवून मद्यपींची तपासणी होणार आहे. त्याचप्रमाणे हॉटेल, लॉजिंग, परमीट रुम, बिअरबार्सला भेट देऊन पोलीस कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतील. थर्टीफर्स्टला दरवर्षी अपघात घडतात, मारहाण, प्रसंगी हत्येचे गुन्हेही घडतात. पोलिसांच्या कारवाईने या प्रकारावर अंकुश लागू शकतोे. (प्रतिनिधी)
उद्याने, पिकनिक स्पॉट, निर्जनस्थळांवर विशेष पाळत
शहरातील उद्याने, तलाव आणि काही पिकनिक स्पॉट्ससह निर्जनस्थळांवर प्रेमीयुगुलांचा वाढता राबता लक्षात घेता याठिकाणांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. आक्षेपार्ह प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून या स्थानांवर गस्त घातली जाईल. तसेच महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील.
रेव्ह पार्ट्यांकडे लक्ष
दरवर्षी मोठमोठ्या हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने रेव्ह पार्ट्या होत असल्याचे निदर्शनास येते. यंदाही ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पार्ट्यांकडे पोलीस यंत्रणा लक्ष ठेऊन राहणार आहे.