डिजिटलायजेशनसाठी ३१ डिसेंबरच 'डेडलाईन'

By Admin | Updated: December 22, 2015 00:19 IST2015-12-22T00:19:40+5:302015-12-22T00:19:40+5:30

अ‍ॅनालॉग फेजवरून डिजिटलवर येण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत असून याला मुदतवाढ दिली जाणार नाही,

31 deadline for digitization | डिजिटलायजेशनसाठी ३१ डिसेंबरच 'डेडलाईन'

डिजिटलायजेशनसाठी ३१ डिसेंबरच 'डेडलाईन'

जिल्हाधिकारी : करमणूक करात होणार वाढ
अमरावती : अ‍ॅनालॉग फेजवरून डिजिटलवर येण्यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची मुदत असून याला मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे येत्या ९ दिवसांत ४० हजार ग्राहकांपर्यंत सेट टॉप बॉक्स पोहोचविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. आयोजित पत्रपरिषदेत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी उपस्थित होते.
जिल्ह्यात ५७ हजार घरांमध्ये केबल जोडणी असून आतापर्यंत केवळ १७ हजार ६४२ सेटटॉप बॉक्स बसविण्यात आले आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख, ६ लाख कुटूंब असताना केवळ ५७ हजार केबल जोडणीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर झाकलेले ५० टक्के केबल टीव्ही कनेक्शन बाहेर येतील व महसुलामध्ये वाढ होईल, असा दावा त्यांनी केला. केबल कनेक्शनमधून जिल्ह्याला आतापर्यंत ४.२५ कोटी रूपये करमणूक कर मिळत होता आता १० कोटी रूपये वसूल करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाकडून देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५२४ शहरांमध्ये ३५ लाख २ हजार ४५३ टीव्ही संचांना सेट टॉप बॉक्स बसविण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. डिजिटल सेट टॉप बॉक्स संदर्भात ग्राहकाला कुठलीही तक्रार असेल तर त्याबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)

१२०० रूपयांत बेसिक सेट टॉप बॉक्स
बाजारात विविध प्रकारचे सेटटॉप बॉक्स उपलब्ध असले तरी सध्या सेटटॉप बॉक्सची किंमत १२०० रूपये आहे. हा सेटटॉप बॉक्स स्टँडर्ड डेफिनेशनमध्ये मोडणारा आहे तर हाय डेफिनेशनचे सेटटॉप बॉक्स १७०० ते २२०० पर्यंत उपलब्ध आहेत. ग्राहकांनी त्या सेटटॉप बॉक्सचे वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावरच रक्कम द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून न दिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी एमएसओ (बहुविध यंत्रणा परिचालक) वर टाकली आहे.

१०० ते १५० रूपये इन्स्टॉलेशन चार्ज
१२०० रुपयांपासून पुढे २२०० रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या सेटटॉप बॉक्स लावून घेण्यासाठी संबंधित केबल आॅपरेटर वा अन्य कुणीही अधिकाधिक १०० ते १५० रूपये ‘इंस्टालेशन चार्ज’ घ्यावा, यापेक्षा अधिक रक्कम आकारू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते व अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी केले. नव्या वर्षात डिजिटल सेटटॉप बॉक्स विना ट्रान्समिशन बंद होणार असले तरी ग्राहकांकडे डिशटिव्ही हा पर्याय असेल.

पुरवठ्यात तफावत
गेल्या चार वर्षांपासून डिजिटल सेटटॉप बॉक्स लावून घेण्यासंदर्भात जनजागृती सुरू आहे. मात्र आता टीव्हीच दिसणार नाही, या भीतीने सेट टॉप बॉक्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने पिळवणुकीच्या तक्रारीत भर पडल्याची कबुली जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. संबंधित केबल आॅपरेटरकडून सेटटॉप बॉक्स घेणे बंधनकारक नाही. ग्राहक बाजारातूनही हा बॉक्स घेऊ शकतो.

Web Title: 31 deadline for digitization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.