वऱ्हाडात यंदा ३०३ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:20+5:302021-05-19T04:13:20+5:30

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही ...

303 farmers commit suicide in Varada this year | वऱ्हाडात यंदा ३०३ शेतकरी आत्महत्या

वऱ्हाडात यंदा ३०३ शेतकरी आत्महत्या

अमरावती : पश्चिम विदर्भात कोरोना संसर्गामुळे यंदा जानेवारी ते एप्रिलदरम्यान ३,१५२ संक्रमितांचा मृत्यू झालेला असताना, याच कालावधीत ३०३ शेतकऱ्यांनीही मृत्यूला कवटाळले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून ही स्थिती स्पष्ट झाली आहे.

अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्याप्रवण पाचही जिल्ह्यासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद सन २००१ पासून येथील विभागीय आयुक्त कार्तयालयात नियमितपणे घेतली जाते. सन २००१ ते एप्रिल २०२१ या कालावधीत या सहा जिल्ह्यांत तब्बल १८,६२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये ८,४०३ शेतकरी आत्महत्या शासनमदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. याशिवाय ८,४७३ प्रकरणे शासनस्तरावर नामंजूर करण्यात आली आहेत. अद्याप ३०४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

थकीत कर्ज, खासगी सावकारांचा व बँकाचा कर्जासाठी तगादा, नापिकी, आपत्तीमुळे नुकसान, मुला-मुलीचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्याच्या संघर्षावर नैराश्याने मात केल्याचे दिसून येते. जगावे कसे, या विवंचनेत पश्चिम विभागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाने विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी गरजू शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे

बॉक्स

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांची स्थिती

यंदाच्या चार महिन्यात अमरावती जिल्ह्यात ५४, अकोला ३७, यवतमाळ ८३, बुलडाणा ७३, वाशिम १६, तर वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी असलेल्या ‘शेतकरी मिशन’चे कामही या दोन वर्षांत थंडबस्त्यात पडले आहे, तर जिल्हास्तरावर प्रकरणे निकाली काढण्यासाठी चार-सहा महिने मीटिंगदेखील होत नसल्याने शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत.

Web Title: 303 farmers commit suicide in Varada this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.